आणीबाणी समर्थक व विरोधक सत्तेसाठी एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 05:26 AM2018-06-29T05:26:24+5:302018-06-29T05:26:26+5:30
देशात ४३ वर्षांपूर्वी आणीबाणी आणणारे आणि आणीबाणीला कडाडून विरोध करणारे सध्या सत्तेच्या लालसेसाठी एकत्र आले असून, विकासाला विरोध करून ते देशात अराजकता निर्माण करू पाहत आहेत
संत कबीर नगर (उत्तर प्रदेश) : देशात ४३ वर्षांपूर्वी आणीबाणी आणणारे आणि आणीबाणीला कडाडून विरोध करणारे सध्या सत्तेच्या लालसेसाठी एकत्र आले असून, विकासाला विरोध करून ते देशात अराजकता निर्माण करू पाहत आहेत, अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे केले.
मगहर गावी असलेल्या संत कबीराच्या मजहरला (समाधी) पंतप्रधानांनी कार्यक्रमाआधी चादर चढवली. त्यानंतरच्या सभेतील त्यांचे भाषण पूर्णपणे लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराप्रमाणे होते. काँग्रेसच्या आणीबाणीला विरोध करणारे अनेक राजकीय पक्ष तसेच त्या काळात तुरुंगात गेलेले विरोधी नेते हे सध्या भाजपाविरोधी आघाडीत एकत्र आले आहेत. त्याचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, या सर्वांच्या एकत्र येण्याचे एकच कारण आहे आणि ते म्हणजे सत्तालोलुपता. सत्तेपोटी परस्परविरोधी विचारांची मंडळी कशी एकत्र येतात, हे सर्वांना पाहायला मिळत आहे.
या सभेत पंतप्रधानांनी महात्मा फुले, महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावांचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, या राष्ट्रपुरुषांनी समाजातील असमानता दूर करण्यासाठी प्रयत्न केले होते. डॉ. आंबेडकर यांनी तर सर्वांना समान अधिकार दिले, राज्यघटना दिली. पण या महापुरुषांच्या नावाने राजकारण करून समाजात दुही निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (वृत्तसंस्था)
आम्ही शांतता,
स्थैर्य देत आहोत
काही राजकीय पक्षांना देशात शांतता, विकास व स्थैर्य नको आहे. त्यांना हवी आहे केवळ अशांतता. देशात अशांतता व अस्थिरता असेल, तरच राजकीय फायदा उठवता येईल, असे या विरोधी पक्षांना वाटत आहे. पण या राजकीय पक्षांना व नेत्यांना देशातील जनतेचा स्वभाव माहीत नाही. जनतेला विकास, शांतता व स्थैर्य हवे आहे आणि आम्ही ते देत आहोत, असा दावा मोदींनी केला.