या अन् करा आमची नार्को, कुस्तीपटूंचे आव्हान : लाइव्ह दाखविण्याचीही मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 08:02 AM2023-05-23T08:02:40+5:302023-05-23T08:02:56+5:30
ब्रिजभूषण यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भाजपचे खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांची नार्को चाचणीचे आव्हान कुस्तीपटूंनी सोमवारी स्वीकारले. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते बजरंग पुनिया म्हणाले की, आम्ही सर्वजण कोणत्याही चाचणीसाठी तयार आहोत, मात्र ती सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हायला हवे. नार्को चाचणी लाइव्ह असावी जेणेकरून संपूर्ण देश प्रश्नोत्तरे ऐकेल.
ब्रिजभूषण यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे.ब्रिजभूषण यांनी रविवारी फेसबुक पोस्ट करत म्हटले होते की, मी माझी नार्को टेस्ट, पॉलिग्राफी टेस्ट आणि लाय डिटेक्टर टेस्ट करायला तयार आहे, पण माझ्यासोबत विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनीही हीच टेस्ट करावी. मंगळवारी इंडिया गेटवर कुस्तीपटू कँडल मार्च काढणार आहेत. त्यामुळे दिल्लीत मंगळवारी मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे.
खाप पंचायतींचे समर्थन
nब्रिजभूषण यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ खाप पंचायतीही आल्या आहेत. पैलवानांच्या समर्थनार्थ आज, मंगळवारी दिल्लीतील इंडिया गेटवर कँडल मार्च काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २८ मे रोजी नवीन संसद भवनासमोर खापांची महिला महापंचायत होणार आहे.
nयामध्ये देशभरातील महिलांशिवाय खाप आणि शेतकरी नेतेही पोहोचणार आहेत. ही महिला महापंचायत पैलवानांना सोबत घेऊन जो काही निर्णय घेईल तो सर्व खापांना मान्य असेल.
कोण काय म्हटले?
आम्ही नार्को चाचणीला सामोरे जाण्यास तयार आहोत, परंतु त्यांनी (ब्रिजभूषण) सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखालील चाचणीला सामोरे जावे, अशी आमची इच्छा आहे जी राष्ट्रीय वाहिन्यांवर थेट प्रक्षेपित केली जाईल.
- बजरंग पुनिया
आम्हाला कोणते प्रश्न विचारले जात आहेत ते पाहू इच्छितो. त्यांनी माझी आणि विनेशची नार्को टेस्ट करायला सांगितली आहे, पण फक्त आम्ही दोघीच का, ज्या मुलींनी तक्रार दाखल केली आहे त्यांचीही नार्को टेस्ट व्हायला हवी. - साक्षी मलिक
ब्रिजभूषणला अनेक माध्यमे ते किती चांगली व्यक्ती आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रसारमाध्यमांनी असे करू नये. ते स्टार नसून लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोपी आहेत. - विनेश फोगाट
या आंदोलनामुळे खेळाचे नुकसान होत आहे. लवकरात लवकर सुनावणी झाली पाहिजे. आज आखाड्यात मुली आल्या होत्या, पण सगळ्यांची निराशा झाली. खेळाडूंची संख्या कमी होत आहे. पालक आपल्या मुलांना परत घेऊन जात आहेत. - ब्रिजभूषण