"आजोबांचा आदर करत असाल तर परत या"; काका कुमारस्वामींचे प्रज्वल रेवण्णांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 03:57 PM2024-05-21T15:57:21+5:302024-05-21T15:57:44+5:30
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी त्यांचा पुतण्या प्रज्वल रेवण्णा यांना परत येण्याचे जाहीर आवाहन केलं आहे.
Prajwal Revanna Obscene Video Case: माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आणि जेडीएस खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या अश्लील व्हिडीओ प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. लैंगिक अत्याचाराचे आरोप होताच प्रज्वल रेवण्णा यांनी देशाबाहेर पळ काढला. मात्र पीडितांच्या तक्रारीनंतर प्रज्वल रेवण्णांचे वडील एचडी रेवण्णा यांच्यावरही गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर आता एचडी कुमारस्वामी यांनी त्यांचा पुतण्या प्रज्ज्वल रेवण्णा यांना भारतात येण्याचं आवाहन केलं आहे.
कर्नाटकमधील हासन लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णांच्या अश्लील व्हिडीओ प्रकरणामुळे कर्नाटकातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. ऐन लोकसभा निवडणुतकीच्या काळातच हे व्हिडीओ समोर आल्याने सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु केले होते. त्यानंतर रेवण्णा यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं. आता प्रज्वल रेवण्णांचे काका एचडी कुमारस्वामी यांनी त्यांना परत येण्याचे आवाहन केलं आहे.
"प्रज्ज्वल रेवण्णा यांना मी आवाहन करतो की, त्यांनी लवकरात लवकर भारतात यावं आणि पोलिसांना तपासात सहकार्य करावं. चोर-पोलिसांचा हा खेळ अजून किती दिवस चालणार? तुम्ही राजकारणात पुढे जावे अशी तुमच्या आजोबांची इच्छा होती. त्यामुळे आता त्यांच्या प्रतिष्ठेचा आदर करत असाल तर भारतात परत या”, असे एचडी कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे, प्रज्वल रेवण्णा यांचे प्रकरण बाहेर आल्यानंतर एचडी कुमारस्वामी यांनी माफी देखील मागितली होती. मी पुन्हा एकदा माझ्या माता-भगिनींची जाहीर माफी मागतो. त्यांची मानसिक वेदना मी समजू शकतो. ही नक्कीच अस्वीकारार्ह बाब आहे. या घटनेमुळे आमची मान शरमेने झुकली आहे,” असे कुमारस्वामींनी म्हटलं होतं.
दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर बोलताना माजी पंतप्रधान देवगौडा यांनी प्रज्ज्वल रेवण्णावर गुन्हा सिद्ध झाल्यास कायद्यानुसार जी काय शिक्षा असेल ती द्यावी, असे म्हटलं आहे. 'प्रज्ज्वल रेवण्णा सारख्या गुन्हेगाराला मोकळे सोडता कामा नये. मात्र आपला मुलगा आणि प्रज्ज्वलचे वडील एचडी रेवण्णा यांच्यावर लावलण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत,' असे एचडी देवेगौडा यांनी म्हटलं आहे.