समाजाचे ऋण फेडण्यासाठी राजकारणात उतरलो
By admin | Published: October 10, 2014 02:42 AM2014-10-10T02:42:11+5:302014-10-10T02:42:11+5:30
व्यवसाय म्हणून राजकारण केले नाही. समाजाचे ऋण फेडता येतील या जाणीवेतून राजकारणात उतरलो. त्यानिमित्ताने जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली.
मुंबई : व्यवसाय म्हणून राजकारण केले नाही. समाजाचे ऋण फेडता येतील या जाणीवेतून राजकारणात उतरलो. त्यानिमित्ताने जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. यापुढेही जनसेवा हाच उद्देश ठेवले आहे, अशी ग्वाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार व विक्रोळी मतदारसंघातील उमेदवार मंगेश सांगळे यांनी दिली.
सांगळे यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कांजुरमार्ग येथे गुरूवारी जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत सांगळे बोलत होते. नगरसेवक, आमदार म्हणून जाहीरनाम्यातून जी वचने, आश्वासने दिली ती सर्व पूर्ण केली, असे सांगळे यांनी सांगितले.
विक्रोळीसह कांजुरमार्गवासीयांचे आरोग्य बिघडविणारे, प्रदुषण निर्माण करणारे डम्पिंग ग्राऊंड येथून हलविण्यासाठी मनसेच्या माध्यमातून आंदोलन छेडले. दरवर्षी सुमारे तीनशे जणांचा बळी घेणारे विक्रोळी फाटक सतत पाठपुरावा करून बंद केले, तेथे पादचारी पूल बांधला, पूर्व-पश्चिम जोडणारा उडडाण पूल मंजूर करून घेतला, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्वीमींगपूलचे काम सुरू करून घेतले, अद्ययावत डायलेसीस सेंटर, सुपर स्पेशालीटी हॉस्पीटलचे काम सुरू झाले, असे सांगत सांगळे यांनी पाच वर्षांमध्ये केलेल्या कामांचा उल्लेख यावेळी केला. तसेच प्रतिस्पर्ध्यांवर शरसंधानही साधले. (प्रतिनिधी)