आमच्या राज्यात या, बैठक घ्या! ‘कार्यकारिणी’साठी अनेक मुख्यमंत्र्यांचा पक्ष नेतृत्वाकडे आग्रह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 08:03 AM2022-12-28T08:03:08+5:302022-12-28T08:03:40+5:30
राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आपल्याच राज्यात व्हावी, असा आग्रह अनेक राज्यांनी पक्ष नेतृत्वाकडे केल्याने भाजप नेतृत्वावर दबाव आहे.
हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आपल्याच राज्यात व्हावी, असा आग्रह अनेक राज्यांनी पक्ष नेतृत्वाकडे केल्याने भाजप नेतृत्वावर दबाव आहे. कर्नाटकात एप्रिल-मेमध्ये निवडणुका होत असून, तेथेच बैठक व्हावी, अशी मागणी या राज्यातून होत आहे. तसेच दुफळीने ग्रासलेल्या कर्नाटकमधील पक्षाला मतभेद दूर करण्यास मदत होईल, असे त्यांचे मत आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही ही बैठक राज्यात व्हावी अशी विनंती पक्षाच्या हायकमांडकडे केली आहे. दिल्ली शाखेलाही ही कार्यकारिणी बैठक दिल्लीत व्हावी असे वाटते. बैठकीच्या स्थळाबाबत भाजपने मात्र मौन बाळगले आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात याबाबतच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. कार्यकारिणीची शेवटची बैठक ऑक्टोबर २०२२ मध्ये हैदराबादमध्ये झाली होती.
अध्यक्षपदी कोण?
जानेवारीत होणारी बैठक या अर्थाने महत्त्वपूर्ण आहे की, जे. पी. नड्डा यांची तीन वर्षांसाठी पुन्हा निवड करायची आहे. नड्डा यांच्या जागी सी. आर. पाटील यांच्या नावाचीही चर्चा आहे. जे. पी. नड्डा यांचे गृहराज्य हिमाचलमध्ये पराभव झाल्याने अनिश्चितताही आहे; परंतु नड्डा यांनी गेल्या तीन वर्षांत अत्यंत चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांना दुसरी टर्म दिली जाईल, असे भाजपमधील सूत्रांचे म्हणणे आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"