'लग्नात या, पण 100च्या नोटांचा बंडल घेऊनच'
By Admin | Published: November 12, 2016 09:04 AM2016-11-12T09:04:18+5:302016-11-12T09:04:18+5:30
राणा यांनी मुलीच्या लग्नासाठी बँकेतून पैसे काढले होते. पण सगळ्या 500 आणि 1000 च्या नोटा असल्याने पैसे असूनही नसल्यासारखं झालं आहे
>ऑनलाइन लोकमत
गाजियाबाद, दि. 12 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटा बंद केल्याने सर्वसामान्यांना दैनंदिन व्यवहारात अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. त्यातच ज्यांच्या घरी लग्न आहेत, त्यांच्यावर तर संकटच कोसळलं आहे. सर्व तयारी झाली आहे, पण व्यवहार नेमका करायचा कसा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. संजय नगर परिसरात राहणा-या एका व्यक्तीने तर नातेवाईकांकडे लग्नासाठी कर्ज मागत 'माझ्या मुलीच्या लग्नाला नक्की या, पण येताना 100च्या नोटांचा एक बंडल घेऊन या. लग्न झालं की सगळ्यांची उधारी फेडून टाकेन', असं सांगितलं आहे.
राणा यांनी मुलीच्या लग्नासाठी बँकेतून पैसे काढले होते. पण सगळ्या 500 आणि 1000 च्या नोटा असल्याने पैसे असूनही नसल्यासारखं झालं आहे. त्यातच सगळ्यांचे पैसे द्यायचे असल्यानं धर्मसंकटच उभं राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी नातेवाईकांकडे मदत मागण्यास सुरुवात केली आहे. मुलीचं लग्न असल्याने नातेवाईकही मदतीसाठी हात पुढे करत आहेत.
मुलीच्या लग्नासाठी फर्निचर आणि महागड्या वस्तू आधीच खरेदी केल्यामुळे राणा यांना तेवढा दिलासा मिळाला आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये लग्नाचे मुहूर्त आहेत. त्यामुळे लग्न असलेल्या घरांमध्ये समस्या वाढल्या आहेत.
मुलीच्या लग्नात येणारं सामान, आचारी यांना चेक देऊ शकत नाही, त्यांना रोखच द्यावी लागेल असं राणा यांनी सांगितलं आहे. सरकारने योग्य निर्णय चुकीच्या वेळी घेतला असं राणा बोलले आहेत.