"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 10:00 PM2024-05-15T22:00:04+5:302024-05-15T22:01:07+5:30
lok sabha election 2024 : उमेदवारी रद्द झाल्याची माहिती श्याम रंगीलाने ट्विटरवरून दिली आहे.
वाराणसी : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांकडून प्रचारासोबत अर्ज भरण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान, कॉमेडियन श्याम रंगीला याचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला. श्याम रंगीला वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, उमेदवारी अर्जात त्रुटी आढळल्याने त्याचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला. दरम्यान, उमेदवारी रद्द झाल्याची माहिती श्याम रंगीलाने ट्विटरवरून दिली आहे.
उमेदवारी रद्द झाल्यानंतर श्याम रंगीला म्हणाला, "वाराणसीतून आपल्याला उमेदवारी दिली जाणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. हृदय नक्कीच तुटले आहे, धैर्य तुटलेले नाही. तुमच्या सर्व सहकार्याबद्दल धन्यवाद. प्रसारमाध्यमांना आणि हितचिंतकांना विनंती आहे की, कृपया आता फोन करू नका, माझ्याकडे जी काही माहिती असेल, ती मी इथे देत राहीन, कदाचित आता थोडा वेळ बोलायची इच्छा नाही."
पुढे श्याम रंगीला म्हणाला, "माझ्यासारख्या अनेकांना, जे पहिल्यांदाच निवडणूक लढवत होते, त्यांना याची माहिती नव्हती. अशा परिस्थितीत कोणती कागदपत्रे सादर करायची आहेत. हे सांगणे हे निवडणूक अधिकाऱ्यांचे काम असले पाहिजे. अधिकारी काहीच बोलले नाहीत. फक्त चार पावत्या घेतल्या, डिपॉझिट स्लिप घेतली आणि आम्हाला बाहेर पाठवले. बाहेर आल्यानंतर आम्हाला वाटले की, आमचे नामांकन झाले आहे. मी माझ्या वकिलाला ते दाखवले तेव्हा त्यांनी थोडी चिंता व्यक्त केली, पण त्यात लिहिलेली वेळ अशी होती की, १४ मे रोजी ११ वाजेपर्यंत दुरुस्ती सादर करता येईल."
"रात्री आम्ही धावत गेलो, पण मदत मिळाली नाही. सकाळी रांगेत उभा होतो. सायंकाळी ५ वाजता माझा नंबर लागला. यादरम्यान अजय राय यांनी १३ मे रोजी आमच्यासमोर उमेदवारी दाखल केली आणि ५ मिनिटांत ते निघून गेले. आम्ही नेते नसून सामान्य जनता होतो आणि लढायला बाहेर पडलो होतो. तसेच, इंदूर आणि सुरतमध्ये जे काही घडले, ते आम्हाला चुकीचे वाटले, म्हणून आम्ही संदेश देण्यासाठी वाराणसीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. आमचा संदेश इतका जोरदार जाईल, याची आम्हाला कल्पना नव्हती", असे श्याम रंगीला म्हणाला.
अखेरच्या दिवशी अनेक उमेदवारांनी दाखल केले अर्ज
वाराणसी लोकसभा मतदारसंघातून अनेक अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवशी भाजपाचे उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय लोक पार्टीचे विनय कुमार त्रिपाठी, भाजपाचे सुरेंद्र नारायण सिंह, अपक्ष उमेदवार दिनेशकुमार यादव, रीना राय, नेहा जैस्वाल, अजित कुमार जैस्वाल, अशोक कुमार पांडे, संदीप त्रिपाठी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.