अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाला प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 05:38 AM2020-08-21T05:38:17+5:302020-08-21T05:38:35+5:30
प्राचीन व पारंपरिक वास्तुशास्त्र व तंत्राच्या आधारे हे राममंदिर बांधले जाणार असून, ते काम ३० ते ४० महिन्यांच्या आत पूर्ण होईल, अशी शक्यता आहे.
अयोध्या : अयोध्येतील राममंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर १५ दिवसांनी या मंदिराच्या बांधकामास गुुरुवारपासून प्रारंभ झाला आहे. एल अँड टी, आयआयटीच्या अभियंत्यांनी रामजन्मभूमीतील मातीच्या परीक्षणाच्या कामास सुरुवात केली. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट हे मंदिर बांधत असून त्या संस्थेने एका टष्ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे. प्राचीन व पारंपरिक वास्तुशास्त्र व तंत्राच्या आधारे हे राममंदिर बांधले जाणार असून, ते काम ३० ते ४० महिन्यांच्या आत पूर्ण होईल, अशी शक्यता आहे.
अयोध्येत राममंदिराचे बांधकाम हे भूकंपरोधक तसेच वादळांना उत्तम तोंड देऊ शकेल, अशा रीतीने करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर लगेचच काही दिवसांत या मंदिराच्या बांधकामाला प्रारंभ होईल, अशी अपेक्षा होती.
>राजस्थानातील दगड वापरणार
राजस्थानात बंशी पर्वतराजीमध्ये मिळणाऱ्या खाणीतील दगडांचा हे राममंदिर बांधताना मोठा वापर करणार आहेत. या मंदिराची उंची १६१ फूट असून ते तीन मजली असेल.
>झाली सुरुवात : अयोध्येत राममंदिरासाठी रामजन्मभूमीची जागा देऊन तसेच याच शहरात नवी मशीद बांधण्यासाठी पाच एकर पर्यायी जागा मुस्लिमांना देऊन हा अनेक शतके प्रलंबित राहिलेला प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने सोडविला होता. राममंदिराचे भूमिपूजन होण्यात कोरोना साथीमुळे उशीर होत होता. त्यामुळे खूप कमी निमंत्रितांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा पार पाडण्यात आला व मंदिराच्या बांधकामाला आता सुरुवात करण्यात आली आहे.