व्हॉट्सअॅपवर 'बीफ'संदर्भात टिपण्णी करणा-या तरूणाचा पोलीस कोठडीत मृत्यू
By admin | Published: October 12, 2016 10:15 AM2016-10-12T10:15:52+5:302016-10-12T10:41:21+5:30
व्हॉट्सअॅपवर 'बीफ'संदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल अटक करण्यात आलेल्या तरुणाचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
रांची, दि.12 - व्हॉट्सअॅपवर 'बीफ'संदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल अटक करण्यात आलेल्या तरुणाचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाल्याची घटना झारखंडमध्ये घडली. मिनाज अन्सारी असे त्या तरूणाचे नाव असून रविवारी राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ( RIMS) रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, अटक केल्यानंतर पोलिसांनी मिनाजला जबर मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झालाचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. मात्र मिनाजच्या मेंदूला सूज आल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगच पोलिसांनी कुटुंबियांचे आरोप फेटाळून लावले.
दरम्यान हे प्रकरण हाताळण्यात हलगर्जीपणा दिसल्याने नारायण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हरीश पाठक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, झारखंडमधील दिगहारी गावात 2 ऑक्टोबर रोजी बीफच्या मुद्यावरून आक्षेपार्ह संदेश व्हॉट्सअॅपद्वारे पसरवण्यात येत होते. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले, चौकशी करुन यापैकी काहींना सोडण्यात आले. मात्र, 3 ऑक्टोबर रोजी मिनाज अन्सारीला अटक करण्यात आली. यानंतर दोन दिवसांनी, पोलीस कस्टडीमध्ये जखमी झाल्याने मिनाजला उपचारांसाठी धनबाद येथील एका हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी मिळाली. त्यानंतर 7 ऑक्टोबरला त्याला RIMS रुग्णालयात आणण्यात आले, आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी चौकशी सुरू आहे. मिनाजच्या मृत्यूमुळे परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.