तक्रारीकरता फेसबुकवर टिपणी करणे हा गुन्हा नव्हे!
By admin | Published: January 26, 2015 03:23 AM2015-01-26T03:23:56+5:302015-01-26T03:23:56+5:30
सोशल नेटवर्किंग साईटस्वरील कायदा व्यवस्था लागू करणाऱ्या संस्थांच्या पेजवर आपली तक्रारवजा टिपणी करणे गुन्हा नाही, असा महत्त्वपूर्ण निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे़
नवी दिल्ली : सोशल नेटवर्किंग साईटस्वरील कायदा व्यवस्था लागू करणाऱ्या संस्थांच्या पेजवर आपली तक्रारवजा टिपणी करणे गुन्हा नाही, असा महत्त्वपूर्ण निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे़
न्या़ व्ही़ गोपाल गौडा आणि न्या़ आऱ बानुमती यांच्या खंडपीठाने बेंगळुरूच्या एका दाम्पत्याला दिलासा देत, हा निवाडा दिला़ या दाम्पत्याने एका पोलीस अधिकाऱ्याच्या गैरवर्तनाबद्दल फेसबुकवरील बेंगळुरू वाहतूक पोलिसांच्या पेजवर आपली तक्रार नोंदवली होती़ पोलिसांनी या आधारावर या दाम्पत्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता़
न्यायालयाने दाम्पत्यावरील हा एफआयआर गैर असल्याचे सांगत कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवला़ वाहतूक पोलिसांनी फेसबुकवर जनतेसाठीच पेज बनवले होते़ या पेजवर आॅनलाईन टिपणी करणे स्वीकारार्ह असेल, असे समजून संबंधित दाम्पत्याने त्यावर आपली तक्रार नोंदवली असावी, असे आम्हाला वाटते, असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले़ कर्नाटक उच्च न्यायालयाने या दाम्पत्याची एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती़ (लोकमत न्यूज नेटवर्क)