कायदा व सुव्यवस्थेवरून अण्णाद्रमुक सरकारवर टीका
By admin | Published: October 9, 2014 03:26 AM2014-10-09T03:26:34+5:302014-10-09T03:26:34+5:30
माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या अटकेनंतर राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्थेची घडी सांभाळण्यात अपयशी झाल्याचा आरोप करीत द्रमुकने बुधवारी अण्णाद्रमुक सरकारवर टीकास्र सोडले.
चेन्नई : माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या अटकेनंतर राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्थेची घडी सांभाळण्यात अपयशी झाल्याचा आरोप करीत द्रमुकने बुधवारी अण्णाद्रमुक सरकारवर टीकास्र सोडले.
पक्षाचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांनी द्रमुकच्या जिल्हा सचिवांच्या बैठकीत या परिस्थितीवर चर्चा केली. त्यांनी सामान्य नागरिकांवर होत असलेले अत्याचार संपविण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
बैठकीत सत्तारूढ अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्यांकडून केल्या जात असलेल्या निदर्शनांमुळे नागरिकांसमोर उभी राहत असलेली बिकट परिस्थिती विशद करून त्यांनी लोकशाही व शांततापूर्वक निदर्शने करण्याचा आग्रह अण्णाद्रमुकला केला. द्रमुकने मिळकतीच्या ज्ञातस्रोतांपेक्षा अधिक धनसंचय केल्याबद्दल दोषी ठरविलेल्या जयललिता यांना शिक्षा ठोठावणाऱ्या न्यायाधीश जॉन मायकल डी कुन्हा यांच्यावर टीका केल्याबद्दल निषेध व्यक्त केला. अण्णाद्रमुककडून त्यांचे चित्रण चुकीच्या पद्धतीने केले जात असल्याचे मत करुणानिधींनी यावेळी व्यक्त केले.
या बैठकीत, अनेक ठिकाणी पोलिसांच्या परवानगीविनाच निदर्शने करण्यात आल्याचे सांगून त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागल्याचे सांगण्यात आले. केंद्राने यात हस्तक्षेप करून या उद्दामपणाला आळा घालावा असेही आवाहन करण्यात आले.
या बैठकीत, अण्णाद्रमुकने मोठाली आश्वासने दिली मात्र त्यांना पूर्ण केले नाही. गेल्या साडेतीन वर्षांच्या काळात १६ वेळेस मंत्री बदलण्यात आले एवढेच नव्हे तर आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांच्या विनाकारण बदल्या करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. (वृत्तसंस्था)