गांधींना मानवंदना देताना शास्त्रींना विसरणा-या मोदींवर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2015 06:33 PM2015-10-02T18:33:51+5:302015-10-02T18:33:51+5:30
महात्मा गांधींना जयंतीनिमित्त अभिवादन करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लालबहादूर शास्त्रींच्या समाधीचे दर्शन न घेतल्याने त्यांच्यावर टीका होत आहे
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - राजघाटावर महात्मा गांधींना जयंतीनिमित्त अभिवादन करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लालबहादूर शास्त्रींच्या समाधीचे दर्शन न घेतल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. महात्मा गांधींप्रमाणेच स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणा-या व भारताचे पंतप्रधानपद भूषवलेल्या लालबहादूर शास्त्रींच्या विजयघाट समाधीकडे न फिरकणा-या पंतप्रधानांवर अरविंद केजरीवाल यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे.
केंद्र सरकार शास्त्रींचे जन्मशताब्धी वर्ष असताना ते साजरे करण्याच्या खर्चात आखडता हात घेत असल्याची टीकाही केजरीवालांनी केली आहे. गांधींप्रमाणेच शास्त्रींची जयंती सरकारी इतमामात साजरी व्हावी अशी विनंती केजरीवालांनी केली आहे.
विशेष म्हणजे विजयघाटावर शास्त्रींना मानवंदना न देणा-या नरेंद्र मोदींनी बिहारमधल्या प्रचारसभेत मात्र शास्त्रींचा उल्लेख मोठ्या सन्मानाने केला आणि पाकिस्तानला लढाईमध्ये धूळ चारण्यात त्यांनी बजावलेल्या भूमिकेचे कौतुक केले.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे लालबदाहूर शास्त्रींचे नातू आदर्श शास्त्री हे आम आदमी पार्टीचे आमदार आहेत.