‘मोदी’ चित्रपटावर बंदी व ‘नमो’ टीव्हीवरही आयोगाचे गंडांतर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 05:29 AM2019-04-11T05:29:55+5:302019-04-11T05:34:07+5:30

निवडणूक आयोगाचा आदेश : लातूरच्या सभेबाबतही मागविला खुलासा

Commission ban on 'Modi' and 'Namo' TV on TV! | ‘मोदी’ चित्रपटावर बंदी व ‘नमो’ टीव्हीवरही आयोगाचे गंडांतर!

‘मोदी’ चित्रपटावर बंदी व ‘नमो’ टीव्हीवरही आयोगाचे गंडांतर!

Next

नवी दिल्ली : निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एखादा पक्ष किंवा व्यक्तीच्या महात्म्याचे एकतर्फी गुणगानाने त्या पक्षास अथवा व्यक्तीस इतरांहून अधिक लाभ होऊ शकेल, अशा प्रकारचे कोणतेही साहित्य प्रसारित वा प्रसिद्ध करण्यास निवडणूक आयोगाने बुधवारी बंदी घातली आहे.


त्यामुळे भाजपाच्या प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘नमो टीव्ही’च्या प्रक्षेपणावर गंडांतर आले आहे, तर ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. आयोगातील सूत्रांनी सांगितले की, वरील आदेशामुळे नमो टीव्हीचे प्रक्षेपणही करता येणार नाही. विवेक ओबेराय याने पंतप्रधान मोदींची भूमिका केलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट सेन्सॉरचे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे १२ एप्रिल रोजी प्रदर्शित करीत आहोत, असे निर्मात्याने निवडणूक आयोगाचा आदेश येण्यापूर्वी जाहीर केले होते.


याशिवाय मोदी यांनी मंगळवारी लातूर जिल्ह्यातील औसा येथे केलेल्या भाषणात जवान व पुलवामातील शहिदांचा उल्लेख करून मतदानाचे आवाहन केल्याने आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारी आयोगाकडे आल्या होत्या. त्याबद्दल आयोगाने मोदी यांच्याकडून त्याबाबत खुलासा मागविला आहे.
आयोगाचा हा आदेश वृत्तपत्रांमधील प्रसिद्धी व इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमधील प्रक्षेपण यासोबत चित्रपटांनाही लागू आहे. आचारसंहिता लागू असेपर्यंत म्हणजेच २३ मे रोजी निकाल जाहीर होईपर्यंत ही बंदी लागू राहील. हा चित्रपट प्रदर्शित करण्यास, तसेच ‘नमो’ टीव्हीच्या प्रक्षेपणास काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी विरोध दर्शविला होता.


‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटास सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळाले आहे. मात्र, वरील आदेशानंतर निवडणूक आयोगातर्फे मोदी चित्रपटाच्या निर्मात्यांना पुढील सूचनेपर्यंत तुम्हाला हा चित्रपट प्रदर्शित करता येणार नाही, असे पत्र पाठविले आहे.
आयोगाने म्हटले की, निवडणूक लढणाऱ्या सर्वांना समान संधी मिळावी व कोणालाही एकतर्फी झुकते माप मिळू नये, यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या सहमतीने आदर्श आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. निवडणूक नि:ष्पक्ष व स्वतंत्र वातावरणात पार पडण्यासाठी आवश्यक आदेश देण्याचे सर्वंकष अधिकार आयोगास आहेत हे सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी अधोरेखित केले आहे.

आयोगाकडे आल्या तक्रारी
एखादी व्यक्ती किंवा पक्ष यांच्याशी केंद्रीय असलेले राजकीय स्वरूपाचे साहित्य निवडणुकीत फायदा घेण्याच्या उद्देशाने विविध प्रकारच्या माध्यमांतून वापरण्याचे प्रयत्न होत असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले. ‘एनटीआर लक्ष्मी’ ‘पीएम नरेंद्र मोदी’ आणि ‘इद्म सिंहम’ या चित्रपटांविषयी तसेच नमो टीव्हीविषयी आयोगाकडे तक्रारी आल्या होत्या.

Web Title: Commission ban on 'Modi' and 'Namo' TV on TV!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.