संजय राऊत यांना आयोगाने फटकारले
By admin | Published: May 21, 2015 12:46 AM2015-05-21T00:46:57+5:302015-05-21T08:32:34+5:30
वादग्रस्त संपादकीय लिहिल्याबद्दल निवडणूक आयोगाच्या चौकशीचा सामना करीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची या वादातून जवळपास सुटका झाली.
हरीश गुप्ता - नवी दिल्ली
‘मुस्लिम व्होट बँकेचे राजकारण संपविण्यासाठी मुस्लिमांचा मताधिकार काढून घ्यावा,’ अशी मागणी करणारे वादग्रस्त संपादकीय लिहिल्याबद्दल निवडणूक आयोगाच्या चौकशीचा सामना करीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची या वादातून जवळपास सुटका झाली. आयोगाच्या आदेशात आचारसंहिता व कायद्यातील वैधानिक तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत राऊत यांना फटकारले असले तरी त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्याचे मात्र टाळले आहे.
वादग्रस्त लेख विविध धार्मिक समुदायांतील मतभेद वाढविणारा व त्यांच्यात तणाव निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतो, असे सांगून आयोगाने राऊत यांना भविष्यात जाहीरपणे बोलताना वा लिहिताना अधिक सतर्क राहण्याचा सल्ला दिला. राऊत यांनी सादर केलेले स्पष्टीकरण आयोगाने फेटाळून लावले व यशवंतराव गडाख विरुद्ध ईव्ही ऊर्फ विखे पाटील (एआयआर १९९४ एससी ६७८) प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेले मत ध्यानात ठेवण्याचा सल्ला दिला. दरम्यान, राऊत यांनी गेल्या एप्रिलमध्ये शिवसेनेच्या मुखपत्रात हा लेख लिहिला होता.