आयोगाचे हॅकॉथॉन म्हणजे निव्वळ फार्स
By admin | Published: June 5, 2017 04:03 AM2017-06-05T04:03:55+5:302017-06-05T04:03:55+5:30
ईव्हीएम मतदानाचा खरेपणा पटवून देण्यासाठी निवडणूक आयोगाने शनिवारी आयोजित केलेला हॅकॉथॉनचा प्रयोग विरोधकांनुसार अखेर फार्सच ठरला
सुरेश भटेवरा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ईव्हीएम मतदानाचा खरेपणा पटवून देण्यासाठी निवडणूक आयोगाने शनिवारी आयोजित केलेला हॅकॉथॉनचा प्रयोग विरोधकांनुसार अखेर फार्सच ठरला. आयोगाने ऐनवेळी अनेक प्रतिबंध घातल्यामुळे ईव्हीएम मतदान प्रक्रियेच्या खरेपणाचा वाद मिटण्याऐवजी उलटा वाढलाच आहे. आयोगाने ठरवलेले हॅकॉथॉनचे नियम एकतर्फी आहेत, अशी तक्रार करीत काँग्रेस आणि ‘आप’ने या ‘इव्हेन्ट’वर बहिष्कार घातला. ईव्हीएमला आव्हान देण्यासाठी मैदानात उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने तक्रारीच्या सुरात पत्रकारांना सांगीतले की अनेक नियमांची आयोगाने पूर्वकल्पनाच दिली नाही त्यामुळे हॅकॉथॉनच्या प्रयोगात भाग घेण्यास ऐनवेळी आम्ही नकार दिला. राष्ट्रवादी काँग्रेसने ईव्हीएमच्या खरेपणाबद्दल ८ आक्षेप नोंदवीत लेखी पत्रच आयोगाकडे सादर केले.
निवडणूक आयोगाच्या हॅकॉथॉनला थेट आव्हान देत ‘आप’ने पत्रकारांना सांगीतले की आयोगाचा प्रयोग म्हणजे निव्वळ फार्स होता. ईव्हीएम कसे हॅक केले जाऊ शकते, याविषयी दिल्लीत ‘आप’ने प्रात्यक्षिकासह जनतेचे प्रबोधन करण्याचा निर्णय घेतला आहे, इतकेच नव्हे तर ईव्हीएमला आव्हान देण्यासाठी जे मतदार उत्सुक आहेत, त्यांंची नोंदणी करण्यास ‘आप’ने आपल्या कार्यालयात शनिवारी प्रारंभही केला. आठवडाभर ही नोंदणी चालणार आहे. आयोगाला प्रतिआव्हान देत ‘आप’च्या नेत्याने पत्रकारांना सांगीतले की हॅकॉथॉनबाबत जे नियम आणि शर्ती लादून आयोगाने ईव्हीएम हॅक करून दाखवण्याचे आव्हान राजकीय पक्षांना दिले. त्याच शर्तीनुसार आयोगाचे अधिकारी आणि ईव्हीएम तयार करणारी कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) च्या तंत्रज्ञ व इंजिनिअर्सना आम्ही देखील आव्हान देतो की जनप्रबोधनासाठी ‘आप’ ने तयार केलेले डेमो ईव्हीएम त्यांनी हॅक करून दाखवावे. त्यात आयोगाचा फार्स आपोआपच उघड होईल.
हॅकॉथॉन प्रयोगाच्या वेळी आयोगाने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सांगीतले की ईव्हीएमला छेडण्याचा प्रयोग कोणी केला तर मशिन आॅटो लॉक होईल. असे असेल तर आयोगाला भीती कशाची वाटते? असा प्रतिसवाल करीत‘आप’ चे नेते म्हणाले, खऱ्या आव्हानांपासून पळ काढण्यासाठी आयोगाने चालवलेली ही बहाणेबाजी आहे. ईव्हीएम आॅटो लॉक झाले तर त्याची सत्यता लगेच सर्वांसमोर येईल. तथापि कोणत्याही ईव्हीएमला आयोग जोपर्यंत अॅक्सेस देत नाही ते हॅक कसे करून दाखवणार? हा खरा सवाल आहे.
‘आप’ च्या समांतर हॅगिंग कार्यक्रमावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना आयोगाने सांगीतले की उत्तराखंड हायकोर्टाच्या निकालात जे मतप्रदर्शन न्यायमूर्तींनी केले, आयोग त्याचे अनुकरण करणार आहे. कोणाचा कितीही विरोध असला तरी मतपत्रिकांद्वारे होणाऱ्या निवडणुकांकडे पुन्हा वळण्याचा प्रश्नच नाही. मतदान यापुढेही ईव्हीएमवरच घेतले जाईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त नसीम जैदींनी स्पष्ट केले.
>ईव्हीएम निवडण्याचा नियम आयोगाने ऐनवेळी बदलला - राष्ट्रवादीचा आरोप
आयोगाच्या हॅकॉथॉनवर आक्षेप नोंदवतांना राष्ट्रवादी काँग्रेसने म्हंटले की ईव्हीएम मशिन निवडण्याचा नियम आयोगाने ऐनवेळी बदलला. जे सील केलेले ईव्हीएम यंत्र आयोगाने प्रयोगासाठी राष्ट्रवादीला दिले, त्याच्या बॅटरीचा नंबर मागीतला तर आयोगाने तो देण्यासही स्पष्ट नकार दिला. राष्ट्रवादीचा मूळ आक्षेप महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वापरलेल्या ईव्हीएमबाबत आहे. या यंत्रांची मागणी पक्षाने आयोगाकडे केली, जी आयोगाने सपशेल फेटाळली. यंत्रांमधले दोष दाखवण्याची संधीच आयोगाने आम्हाला दिली नाही, असे स्पष्ट करीत राष्ट्रवादीचा नेता म्हणाला, हॅकॉथॉनमधे नेमके काय घडेल याची बहुदा आयोगालाच खात्री नसावी म्हणूनच ऐनवेळी अनेक नवे नियम आयोगाने सांगीतले त्याची पूर्वकल्पना मात्र कोणालाही दिली नव्हती. अखेर राष्ट्रवादीने ८ आक्षेपांचे तक्रारपत्र लेखी स्वरूपात आयोगाला दिले व हॅकॉथॉनमधे भाग घेण्यास स्पष्ट नकार दिला. तथापि राष्ट्रवादी आणि मार्क्सवाद्यांच्या आक्षेपांचे पूर्ण समाधान आयोगाने केले, असा खुलासाही आयोगातर्फे शनिवारी करण्यात आला. वास्तव मात्र वेगळेच आहे, असे राष्ट्रवादीच्या प्रतिनिधींकडून समजले.