खासदारांच्या वेतनवाढीवर समिती फेरविचार करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2015 11:14 PM2015-07-12T23:14:04+5:302015-07-12T23:14:04+5:30
खासदारांचे वेतन व भत्ते याबाबत विचार करीत असलेली संयुक्त संसदीय समिती येत्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत आपल्या अनेक शिफारशींवर फेरविचार करण्याची शक्यता आहे
नवी दिल्ली : खासदारांचे वेतन व भत्ते याबाबत विचार करीत असलेली संयुक्त संसदीय समिती येत्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत आपल्या अनेक शिफारशींवर फेरविचार करण्याची शक्यता आहे. खासदारांचे वेतन, मतदारसंघ व कार्यालय भत्त्यात १०० टक्के वाढ करण्याच्या समितीच्या प्रस्तावावर चौफेर टीका करण्यात येत आहे.
समितीने अद्याप आपला अहवाल सादर केलेला नाही आणि खासदारांचे वेतन व भत्ते वाढविण्याच्या संदर्भात अद्याप निर्णयही घेतलेला नाही, असे या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष आणि भाजपाचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
पुढच्या सोमवारी समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे, असे आदित्यनाथ म्हणाले. खासदारांच्या अनेक मागण्या मान्य करण्यास ही समिती अनुकूल होती. या मागण्यांमध्ये वेतन, मतदारसंघ आणि कार्यालयीन भत्त्यात १०० टक्के वाढ तसेच माजी खासदारांच्या पेन्शनमध्ये ७५ टक्के वाढ करण्याचा समावेश आहे. तथापि या मुद्यावर आता मोठा वाद निर्माण झाला आहे आणि अनेक राजकीय पक्षांनी या वेतनवाढीच्या प्रस्तावावर प्रखर टीका केली आहे. त्यामुळे या प्रस्तावावर फेरविचार केला जात आहे आणि संसदीय समिती आपल्या काही शिफारशी मागे घेण्याचीही शक्यता आहे. काही प्रस्तावांना सरकारनेही पाठिंबा दिलेला नाही. या मुद्यावरून वाद निर्माण झाल्यामुळे समितीला जरा विलंबानेच निर्णय घ्यायला पाहिजे, असे संसदीय समितीच्या काही सदस्यांचे म्हणणे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)