काश्मीरमधील काही भागांत संचारबंदी; परिस्थिती सुरळीत नाही, सर्वसामान्यांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 03:32 AM2019-11-02T03:32:29+5:302019-11-02T03:32:52+5:30
श्रीनगरसह काश्मीर खोऱ्यात जिथे हिंसाचार होण्याची शक्यता आहे तिथे संचारबंदी लागू केली आहे.
श्रीनगर : नमाज पठणानंतर हिंसक घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन काश्मीरमधील काही भागांमध्ये शुक्रवारी संचारबंदी लागू करण्यात आली. ३७० कलम रद्द केल्यानंतरच्या ८९ व्या दिवशी, शुक्रवारीही काश्मीरमधील परिस्थिती सुरळीत नसल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला.
श्रीनगरसह काश्मीर खोऱ्यात जिथे हिंसाचार होण्याची शक्यता आहे तिथे संचारबंदी लागू केली आहे. जम्मू-काश्मीरचे विभाजन करून जम्मू-काश्मीर व लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला असून, तो निर्णय गुरुवारपासून लागू झाला. त्याविरोधात हिंसक निदर्शने होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही दक्षता घेण्यात आली. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांची दोन वाहने काही जणांनी जाळली. काश्मीर खोºयातील सर्व बाजारपेठा, तसेच सार्वजनिक वाहतूक सेवा अद्यापही बंदच आहे. मात्र, १० वी व १२ वीच्या परीक्षा वेळापत्रकाप्रमाणे पार पडल्या.
मोदींवर मेहबुबा मुफ्तींच्या कन्येची टीका : मोदी, तुम्ही तीन महिन्यांपासून माझी आई मेहबुबा मुफ्ती यांना बेकायदेशीररीत्या डांबून ठेवले आहे अशी तक्रार मेहबुबा यांची कन्या इल्तिजा मुफ्ती यांनी शुक्रवारी टिष्ट्वटरवर केली आहे. काश्मीरमध्ये राजकीय नेते, कार्यकर्ते, नागरिक, अल्पवयीन मुले अशा हजारो जणांना सरकारने डांबून ठेवले आहे. या लोकांना त्यांच्या मातांपासून अजून किती काळ लांब ठेवणार आहात असा सवालही इल्तिजा यांनी मोदी यांना विचारला आहे.