‘लॉकडाऊन’मध्ये कोरोना योद्ध्यांसाठी त्या रणरागिणींचे ‘कम्युनिटी किचन!’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 10:57 PM2020-07-22T22:57:33+5:302020-07-22T22:58:02+5:30

स्वत:लाच विचारला प्रश्न- ‘ते आमच्यासाठी काम करीत आहेत, तर आम्ही त्यांच्यासाठी का काम करू नये!’

‘Community Kitchen!’ For those warriors for the Corona Warriors in ‘Lockdown’. | ‘लॉकडाऊन’मध्ये कोरोना योद्ध्यांसाठी त्या रणरागिणींचे ‘कम्युनिटी किचन!’

‘लॉकडाऊन’मध्ये कोरोना योद्ध्यांसाठी त्या रणरागिणींचे ‘कम्युनिटी किचन!’

Next

गुवाहाटी : लॉकडाऊनच्या काळात कुटुंबापासून दूर असलेल्या कोविड-१९ योद्ध्यांना दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी अरुणाचल प्रदेशमधील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील भालुकपाँग येथे काही महिलांनी स्वयंस्फूर्तीने मोफत भोजनव्यवस्था केली होती. ‘भालुकपाँग महिलांचा लंगर’ या नावाने प्रसिद्ध झालेले त्यांचे ‘कम्युनिटी किचन’ राष्ट्रीय पातळीवर गाजत आहे. एका भोजन लाभार्थ्याने केलेल्या फेसबुक पोस्टने या सामान्य कुटुंबातील महिलांचा हा लंगर व्हायरल झाला.

देशव्यापी कोरोना लॉकडाऊन सुरू होऊन साधारण एक आठवडा झाला होता. डॉक्टर, नर्स, पोलीस, तसेच इतरही अनेक क्षेत्रांतील लोक जीव धोक्यात घालून काम करीत होते. मात्र, अनेकांच्या जेवणाचे वांधे झालेले होते. हे पाहून भालुकपाँगमधील काही महिलांनी एकत्र येऊन या लंगरची कल्पना मांडली. इंग्रजीच्या शिक्षिका असलेल्या २५ वर्षीय निशी जेबिसामाम यांनी या आठवणींना उजाळा देत सांगितले की, ‘ते आपल्यासाठी काम करीत आहेत, तर आपण त्यांच्यासाठी काम का करू नये’, असा प्रश्न आमच्या डोक्यात आला होता. आम्ही तो काही जवळच्या लोकांना, तसेच परिचितांना तो बोलून दाखविला. त्यावर अनेक प्रतिप्रश्न समोर आले, ‘हे जोखमीचे नाही का? आपल्याला लागण झाली तर काय?’ या प्रश्नांनंतर लगेच सल्लेही लोकांकडून आले-‘या भानगडीत पडूच नका!’

मात्र, या बहादूर महिलांनी या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. जेबिसामाम यांनी सांगितले की, ‘एप्रिलच्या एका सकाळी मी दहा महिलांच्या या समूहात सामील झाले. या समूहात गृहिणी होत्या, परिचारिका आणि शिक्षिकाही होत्या. रिकाम्या पडलेल्या एका सरकारी शाळेत आम्ही आमचा ‘लंगर’ सुरू केला. शाळेतील डेस्क आणि बेंच बाजूला करण्यात आले. मोठी भांडी आणण्यात आली. बाह्या वर खेचल्या आणि कामाला सुरुवात केली.’

पहिल्या दिवशी त्यांनी ७0 जणांचे जेवण तयार केले; पण प्रत्यक्षात ३५ जणच जेवायला आले. मात्र, हळूहळू त्यांच्या लंगरची माहिती पसरत गेली आणि संख्या दुप्पट झाली. त्यांनी हे कम्युनिटी किचन अत्यंत तळमळीने आणि मन लावून चालविले. जेवणाच्या मेनूत वैविध्य ठेवले. ईशान्य भारतातील खाद्य संस्कृतीनुसार, भात, डाळ, उकडलेल्या भाज्या नियमित जेवणात असत. कधी डुकराचे मांस आणि बांबूच्या कोंभाचे लज्जतदार कालवण, तर कधी पारंपरिक रानभाज्यांसोबत शिजविलेले चिकन असे. कधी मटनाची मेजवानीही त्या देत. खाणारे तृप्त होत.

या ‘कम्युनिटी किचन’च्या संकल्पक ३९ वर्षीय मेरी सिसिडोव यांनी सांगितले की, ‘आम्ही आमच्या जेवणासाठी एक पैसाही आकारला नाही. जो येईल त्याला मोफत जेवण दिले. डॉक्टर, नर्स, पोलीस आणि रोजंदारी कामावरील मजूर यांना जेवू घालणे हाच आमचा उद्देश होता. ज्याला गरज आहे, त्याला मोफत जेवण उपलब्ध करून देणे हा आमचा निर्धार होता. त्यानुसार आम्ही काम केले.’

सिसिडोव या भालुकपाँग येथील ‘कम्युनिटी हेल्थ सेंटर’मध्ये (सीएचसी) स्टाफ नर्स आहेत. लॉकडाऊनमध्ये एक आठवडा काम केल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की, लॉकडाऊनमुळे अनेकांच्या जेवणाची समस्या निर्माण झाली आहे. कारण नेहमीची जेवणाची सर्वच ठिकाणे लॉकडाऊनमुळे बंद झाली होती. सर्व जण घरात होते; पण त्यांच्यासारखे काही लोक तर कामावर होते. उलट त्यांच्या जबाबदाऱ्या वाढल्या होत्या. कामावर असलेल्या या लोकांना जेवण कोण देणार, हा प्रश्न अनुत्तरित होता.

अनेकांवर उपाशी झोपण्याची वेळ आली.भालुकपाँग हे शहर आसामातील पश्चिम कामेंग, तवांग आणि पूर्व कामेंग या तीन जिल्ह्यांचे प्रवेशद्वार आहे. येथे निमलष्करी दले आणि लष्कराचाही राबता असतो. येथे मालपुरवठ्याचे केंद्र असल्यामुळे लोकांची गर्दी असते. यातीलही अनेकांवर उपाशी झोपण्याची वेळ आली होती.

भालुकपाँगच्या कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या सिनिअर मेडिकल आॅफिसर डॉ. तागे नेहा यांनी सांगितले की, ‘कोरोना योद्धा या स्वरूपात आम्ही लढाईच्या आघाडीवर होतो. सकाळी लवकर कामावर जावे लागे. घरी जायला रात्र होत असे. सुरुवातीच्या काळात केवळ संध्याकाळचे जेवणच आमच्या नशिबात होते. मग या महिला तारणहार बनून समोर आल्या आणि आमच्या जेवणाची समस्या सुटली. छान गरमागरम जेवण त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिले. तेही मोफत.’

सिसिडोव यांनी आपल्या काही नोतवाईकांना पहिल्यांदा ‘कम्युनिटी किचन’बाबत विचारणा केली. त्यातील प्रत्येकच उत्सुक होता, असे नव्हे; पण काहींचा प्रतिसाद सकारात्मक होता. अखेर दहा महिला एकत्र आल्या. अरुणाचल प्रदेशसह संपूर्ण ईशान्य भारतात कोरोना साथीचा उद्रेक झाल्यानंतर गेल्या आठवड्यात हे कम्युनिटी किचन चालविणे धोकादायक झाले. त्यामुळे ते बंद करावे लागले.
सिसिडोव यांनी सांगितले की, आम्ही आमचे किचन कायमस्वरूपी बंद केलेले नाही. परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर ते आम्ही पुन्हा सुरू करू.
 

नियमित आॅफिस सांभाळून कम्युनिटी किचनमध्ये काम

६0 वर्षीय बाजीम सार्गो या ‘कम्युनिटी किचन’च्या सर्वांत ज्येष्ठ सदस्य. त्याही किचनच्या कामात हिरीरीने सहभागी होत्या. जेबिसामाम यांनी सांगितले की, ‘भाज्या चिरणे, दुसºया दिवशीचा मेनू ठरविणे आणि जेवणाची लज्जत आणखी कशी वाढविता येईल, यावर विचार-विनिमय करणे यात वेळ भुर्रकन उडून जात असे.’ सिसिडोव यांनी सांगितले की, ‘सीएचसीमधील सर्व काम नियमिपणे सांभाळून मी कम्युनिटी किचनमध्ये काम करीत असे. सुरुवातीला आॅफिसातील काम आटोपून घेत असे. सकाळी ११.00 वाजता किचनमध्ये येत असे, तसे तर किचनचे काम सकाळी ८.00 वाजताच सुरू झालेले असे.

भाज्या मिळविणे होते सर्वांत अवघड काम

लॉकडाऊनच्या काळात बाजार बंद असल्यामुळे भाज्या मिळविणे हे सर्वांत कठीण काम होते. आम्ही १0 किलोमीटर अंतरावरील एका गावात जाऊन थेट शेतकऱ्यांकडून भाज्या आणायचो. आमचे किचन खरेखुरे कम्युनिटी किचन होते. कारण सर्वच लोकाश्रयावर चालत होते. मांसाहारासाठी आवश्यक असलेले प्राणीही लोक दानाच्या स्वरूपात देत.

Web Title: ‘Community Kitchen!’ For those warriors for the Corona Warriors in ‘Lockdown’.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.