दिवाळीची भेट देण्यासही कंपन्यांनी हात आखडले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 09:04 AM2018-11-07T09:04:34+5:302018-11-07T09:06:15+5:30
यंदाची दिवाळी खासगी कंपन्यांसाठी खूपच डोकेदुखीची ठरली असून कर्मचाऱ्यांवर खर्च करताना या कंपन्यांनी हात आखडता घेतला आहे.
नवी दिल्ली : यंदाची दिवाळी खासगी कंपन्यांसाठी खूपच डोकेदुखीची ठरली असून कर्मचाऱ्यांवर खर्च करताना या कंपन्यांनी हात आखडता घेतला आहे. एकीकडे गिफ्टच्या वस्तूंच्या किंमती वाढलेल्या असतानाच जीएसटीमध्येही याबाबत स्पष्टता न देता ट्रक्स परताव्यापासून दूर ठेवण्यात आल्याने कंपन्यांनी पाठ फिरविली आहे.
दिवाळीनिमित्त देण्यात येणारे गिफ्ट हे याआधी टॅक्समध्ये सूट मिळवून देत होते. यामुळे कंपन्या तेव्हा आपले कर्मचारी आणि संबंधित कंपन्यांचे अधिकारी यांना चांगली चांगली गिफ्ट देत होत्या. अशा प्रकारचे उपहार देणे म्हणजे कंपन्या त्यांच्या व्यवसाय वाढविण्यासाठी देत असल्याचे सांगत होत्या. यामुळे यासाठी मोजलेल्या पैशांवर टॅक्स परतावा मिळायला हवा अशी मागणी गेल्या वर्षीपासून कंपन्या करत आहेत.
कार्पोरेट कंपन्या त्यांचे कर्मचारी, ग्राहक, डीलर, एजंट आदींना दिवाळीच्या काळात गिफ्ट देतात. हे व्यवसाय वृद्धीसाठी करतात. यामुळे ही गिफ्ट सेक्शन- 16 नुसार व्यवसायवृद्धीसाठी खर्च रकमेमध्ये धरली जावीत, असे पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सच्या कर विभागाचे अध्यक्ष विमल जैन यांनी सांगितले.
जीएसटीमध्ये चॉकलेट, स्टेशनरी, घरगुती वस्तू, कपडे आणि अन्य वस्तूंवरील कर वाढल्यामुळे त्या महाग झाल्या आहेत. यामुळे कंपन्यांना गिफ्टसाठी दुप्पट किंमत मोजावी लागत आहे. जीएसटीपूर्वी कर परतावा मिळत होता. मात्र, जीएसटीच्या सेक्शन 17(5) मध्ये काही सेवा आणि खर्चांवर कर परतावा बंद करण्यात आला आहे. यामध्ये गिफ्टचाही समावेश आहे.