भाजपाला देणगी देणाऱ्या कंपन्यांना बुलेट ट्रेन प्रकल्पाची कंत्राटं; गुजरातस्थित कंपन्यांवर सरकार मेहेरबान?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 08:03 AM2019-12-04T08:03:01+5:302019-12-04T08:10:07+5:30
गुजरातमधील तीन कंपन्यांना बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत येणाऱ्या विविध कामांची कंत्राटं
मुंबई: राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात यशस्वी झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील प्रकल्पांकडे मोर्चा वळवला आहे. आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पुनर्विचार केला जाईल, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यामुळे मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्प (एमएएचएसआर) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकल्पांतर्गत येणारी काही कंत्राटं भाजपाला देणगी देणाऱ्या कंपन्यांना दिली गेली असल्याचं वृत्त 'द क्विंट' या इंग्रजी संकेतस्थळानं दिलं आहे.
भाजपाला देणगी देणाऱ्या कंपन्यांची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सनं २०१७-१८ मध्ये जाहीर केली. भाजपानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीचा आधार यासाठी घेण्यात आला. त्यामध्ये गुजरातस्थित क्युब कन्स्ट्रक्शन इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीच्या नावाचा समावेश आहे. या कंपनीनं आतापर्यंत भाजपाला ५५ लाख रुपयांची रक्कम देणगी स्वरुपात दिली आहे. २०१२-१३ मध्ये दोनदा, तर २०१७-१८ मध्ये एकदा या कंपनीनं भाजपाला देणगी दिली. या कंपनीला बडोदा स्थानक परिसरात कम्प्युटराईज्ड रिझर्व्हेशन सिस्टम कॉम्प्लेक्ससाठी भाडेतत्त्वावर जमीन देण्यात आली आहे.
बडोदास्थित क्युब कन्स्ट्रक्शन इंजिनियरिंग लिमिटेडच्या संकेतस्थळावर त्यांनी केलेल्या कामांची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार कंपनीला गुजरात सरकारकडून अनेक कंत्राटं मिळाल्याचं स्पष्ट होतं. गुजरात औद्योगिक विकास महामंडळ, गुजरात फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय विज्ञान संस्था, गुजरात शहर विकास महामंडळ, गुजरात शिक्षण विभागाची अनेक कंत्राटं क्युब कन्स्ट्रक्शन इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीला मिळाली आहेत.
केंद्र सरकारची अनेक कंत्राटंदेखील क्युब कन्स्ट्रक्शन इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीला मिळाल्याचं त्यांच्या संकेतस्थळावरील माहितीवरुन समजतं. ओएनजीसी, बीएसएफ, इस्रोसाठी केलेल्या अनेक कामांचा उल्लेख कंपनीच्या संकेतस्थळावर आहे. कंपनीनं पूर्ण केलेल्या प्रकल्पांचं उद्घाटन भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी केल्याचे फोटोदेखील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. कंपनीच्या एका प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. तर भाजपा अध्यक्ष अमित शहांचादेखील उद्घाटनादरम्यानचा फोटो संकेतस्थळावर पाहायला मिळतो. विशेष म्हणजे त्यावेळी शहा सरकारमध्ये कोणत्याही पदावर नव्हते.
भाजपाला देणगी देणाऱ्या आणखी दोन कंपन्यांनादेखील मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाची कंत्राटं मिळाली आहेत. बुलेट ट्रेनशी संबंधित विविध इमारतींच्या उभारणींचं कंत्राट के. आर. सावनी नावाच्या कंत्राटदाराला मिळालं आहे. सावनी बडोदा स्थानकाच्या आसपास इमारतींची उभारणी करणार आहेत. सावनी यांनी २०१२-१३ या आर्थिक वर्षात भाजपाला २ लाखांची देणगी दिली होती. भाजपानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत सावनी यांनी दिलेल्या देणगीचा उल्लेख आहे.
मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पांतर्गत वाटवा ते साबरमती दरम्यान विविध कामांचं कंत्राट धनजी के. पटेल या कंत्राटदाराला मिळालं आहे. पटेल यांनी २०१७-१८ या आर्थिक वर्षात भाजपाला २.५ लाख रुपयांची देणगी दिली. याशिवाय रचना एन्टरप्रायजेस नावाच्या गुजरातस्थित कंपनीला बुलेट ट्रेनच्या १४, १५ आणि १६ या प्रस्तावित लाईन्सच्या विद्युतीकरणाचं कंत्राट देण्यात आलं आहे. गुजरातमध्ये याच नावाची एक कंपनी अस्तित्वात असून या कंपनीनं भाजपाला अनेकदा देणग्या दिल्या आहेत. मात्र या दोन्ही कंपन्या एकच आहेत का, याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.