प्रवासी विम्यातून कंपन्यांना मिळाले ४६ कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 02:15 AM2019-07-22T02:15:37+5:302019-07-22T02:16:04+5:30
दाव्यांपोटी रेल्वे प्रवाशांना दिले ७.२९ कोटी
नवी दिल्ली : रेल्वेच्या विमा योजनेंतर्गत गत दोन वर्षांत खासगी विमा कंपन्यांना जवळपास ४६ कोटी रुपयांच्या प्रीमियमची कमाई झाली आहे. या काळात त्यांनी विमा दाव्यांसाठी ७ कोटी रुपये दिले आहेत. माहिती अधिकारांतर्गत हा खुलासा झाला आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या मालकीच्या आयआरसीटीसीने विमा योजनेसाठी श्रीराम जनरल इन्श्योरन्स कंपनी लिमिटेड, आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्श्योरन्स कंपनी लिमिटेड आणि रॉयल सुंदरम जनरल इन्श्योरन्स कंपनी लिमिटेडशी करार केला आहे. या योजनेची सुरुवात सप्टेंबर, २०१६ मध्ये झाली होती. सुरुवातीला याचा प्रीमियम प्रति प्रवासी ०.९२ रुपये होता.
रेल्वेने ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत प्रीमियम स्वत: भरला, पण त्यानंतर प्रीमियम प्रवाशांकडून वसूल केला जाऊ लागला. हा प्रीमियम कमी करून ०.४९ रुपये प्रति प्रवासी आहे. या योजनेचा लाभ कन्फर्म वा आरएसी तिकीट असलेल्या व आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक करणाऱ्यांना मिळतो. रेल्वे अपघातात मृत्यू होणाºया वा जखमी होणाऱ्यांच्या नातेवाइकांना विमा रक्कम दिली जाते. मध्य प्रदेशातील चंद्रशेखर गौर यांनी केलेल्या अर्जातून ही माहिती समोर आली.
गत दोन वर्षांत आयआरसीटीसीने विमा कंपन्यांना प्रीमियमच्या स्वरूपात ३८.८९ कोटी दिले आहेत, तर विमा कंपन्यांनी प्रवाशांना ७.२९ कोटींची रक्कम दिली आहे. याबाबत अधिकारी म्हणाले की, गत दोन वर्षांत दुर्घटनांमध्ये घट झाली आहे व विमा दावेही कमी झाले आहेत.