शुद्ध आणि ताजी हवा विकणे आहे! पण त्यासाठी 'इतका' खर्च करायला हवा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 10:09 AM2018-11-14T10:09:45+5:302018-11-14T10:18:52+5:30
दिल्लीकरांना शुद्ध, ताजी आणि नैसर्गिक हवा मिळावी म्हणून काही देशी-विदेशी कंपन्यांनी दिल्ली-एनसीआर परिसरात शुद्ध हवेच्या बाटल्यांची विक्री सुरू केली आहे.
नवी दिल्ली - दिल्लीत प्रदुषणाची समस्या निर्माण झाल्याने नागरिकांना अनेक आजारांना समोरं जावं लागत आहे. दिल्लीतील हवेमुळे त्रासला असाल तर आता घरबसल्या देश विदेशातील शुद्ध आणि ताजी हवा तुम्ही विकत घेऊ शकता. मात्र यासाठी खर्च करावा लागणार आहे. दिल्लीमध्ये बाटलीबंद शुद्ध हवेची विक्री सुरू झाली आहे.
दिल्लीकरांना शुद्ध, ताजी आणि नैसर्गिक हवा मिळावी म्हणून काही देशी-विदेशी कंपन्यांनी दिल्ली-एनसीआर परिसरात शुद्ध हवेच्या बाटल्यांची विक्री सुरू केली आहे. लिटरच्या हिशोबाने ताजी हवा विकत घेता येणार आहे. सध्या फोन आणि ऑनलाईनवरून या बाटल्यांची विक्री सुरू असून लवकरच त्या बाजारात विक्रीसाठी येणार आहेत. ही शुद्ध हवा डोंगर-दऱ्यांतील असल्याचा दावा कंपन्यांनी केला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या एका कंपनीने दोन साइजमध्ये या बाटल्या विक्रीला आणल्या आहेत. 7.5 लिटरच्या शुद्ध हवेच्या बाटलीची किंमत 1499 रुपये तर 15 लिटरच्या बाटलीची किंमत 1999 रुपये एवढी आहे. या संदर्भात कंपनीशी संपर्क साधला असता सध्या तरी फोन आणि ऑनलाईनवरून बाटलीची ऑर्डर घेतली जात असल्याचं सांगितलं. तसेच एका भारतीय कंपनीनेही उत्तराखंडमधील डोंगरदऱ्यांमधील हवा विकत असल्याचा दावा केला आहे. या कंपनीची 10 लीटर शुद्ध हवेची बाटली 550 रुपयांना विकत आहे. या बाटलीतून 160 वेळा शुद्ध हवा घेता येत असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.
असा केला जातो वापर
- शुद्ध हवेच्या बाटलीसोबत एक पंपही मिळतो, जो मास्कप्रमाणेच असतो.
- हे मास्क तोंडाला लावल्यावर बाटलीचं बटण पूश करायचं.
- त्यामुळे स्प्रेद्वारे शुद्ध हवा श्वासाच्या माध्यमातून शरिरात घेता येते.