कंपनीच 'जुळवून देणार रेशीमगाठी'; कर्मचाऱ्यांसाठी सुरू केली मेट्रोमोनियल साईट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 02:55 PM2023-03-03T14:55:50+5:302023-03-03T14:57:30+5:30
कंपनीच्या सुरू केलेल्या पोर्टलमध्ये कंपनीतील कर्मचारी आपल्याच कंपनीत जोडीदार शोधू शकणार आहेत.
नवी दिल्ली - इंडियन ऑईल कार्पोरेशन कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या लग्नाच्या गाठी जुळवण्याचं काम हाती घेतलं आहे. सध्या समाजात मुलांची वाढलेली संख्या आणि मुलींच्या कुटुंबीयांच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे लग्न जुळताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच, अद्यापही केवळ आपल्याच जातीमधील, नातेवाईकांमधील कुटुंबात नातं जोडण्याचं, लग्न करण्याचं प्रमाण अधिक आहे. मात्र, आता इंडियन ऑईल कंपनीने कंपनीमार्फतच कर्मचाऱ्या लग्नगाठ बांधण्याची जबाबदारी उचललीय. त्यासाठी, कंपनीने २०२३ मध्ये एक मॅट्रोमॅनियल पोर्टल सुरू केलं आहे. या पोर्टलच्या माध्यमातून आता २ लग्नही जमली आहेत.
कंपनीच्या सुरू केलेल्या पोर्टलमध्ये कंपनीतील कर्मचारी आपल्याच कंपनीत जोडीदार शोधू शकणार आहेत. कंपनीचा हा प्रयत्न यशस्वी झाला असून २ जणांचे शुभ मंगल सावधानही झालं आहे. IOCians2gether असं कंपनीच्या नवीन पोर्टलचं नाव आहे. या माध्यमातून कंपनीचे सीमा यादव आणि तरुण बंसल हे एकत्र आले होते. त्यानंतर, नुकतेच त्यांनी लग्नही केले. कंपनीच्या या सुविधेतून लग्नगाठ बांधणारे सीमा आणि तरुण हे पहिलं जोडपं ठरलं. त्यामुळेच, या दोघांच्या लग्नाला IOC चे चेअरमन आणि एमडी माधव वैद्य हेही उपस्थित होते. सोशल मीडियावरुन त्यांनी या लग्नाचा फोटो शेअर केला असून त्यास लोकांची चांगली पसंती मिळाली आहे.
श्रीकांत यांनी सोशल मीडियावर लग्नातील उपस्थितीचा फोटो शेअर केला. त्यासोबतच, आमच्या कंपनीने सुरू केलेल्या 'IOCians2gether' या सुविधेतून तरुण आणि सीमा एकत्र आले आहेत, त्यामुळेच या लग्नासाठी मीही उत्साही होतो. दोघांनाही आयुष्यभरासाठी खूप साऱ्या शुभेच्छा... असं कॅप्शन वैद्य यांनी दिलं आहे.
दरम्यान, सीमा आणि तरुण हे कंपनीच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंट विभागात गेल्या ५ वर्षांपासून काम करत आहेत. त्यामुळेच, दोघांचे अगोदरपासूनच प्रेम होते, केवळ या मेट्रोमोनियल वेबसाईटमुळे हे लग्न जमल्याचं खोटं आहे, असे नेटीझन्स म्हणत आहेत. तसेच, कंपनीच्या वेबसाईटला प्रमोट करण्यासाठी ही उठाठेव केल्याचा आरोप सोशल मीडिया युजर्संने केला आहे.