सदोष प्रत्यारोपणासाठी २० लाखांची नुकसान भरपाई द्या, जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 02:03 AM2018-09-07T02:03:12+5:302018-09-07T02:03:28+5:30
कंबरेच्या खालील भागाचे (खुबा) प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांना २० लाख रुपयांची अंतरिम नुकसान भरपाई द्या तात्काळ द्या, असे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या केंद्रीय औषधे प्रमाणिकरण संस्थेने (सीडीएससीओ) जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीला दिले.
नवी दिल्ली : कंबरेच्या खालील भागाचे (खुबा) प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांना २० लाख रुपयांची अंतरिम नुकसान भरपाई द्या तात्काळ द्या, असे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या केंद्रीय औषधे प्रमाणिकरण संस्थेने (सीडीएससीओ) जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीला दिले. या प्रत्यारोपणावेळी कंबरेत बसविण्यात आलेल्या सदोष प्लेट्समुळे रक्तात विषारी घटक पसरत असल्याचे निदर्शनास आल्याबद्दल संस्थेने कंपनीला फटकारले.
जॉन्सन अॅण्ड जॉन्सन ही अमेरिकन कंपनी मेसर्स डीप्यू इंटरनॅशनल लिमिटेड या ब्रिटीश कंपनीने तयार केलेल्या अशा प्रत्यारोपणाच्या साहित्याची विक्री करते. त्यांच्याकडून हे साहित्य खरेदी करून जॉन्सन अॅण्ड जॉन्सनने भारतातील ४७०० शस्त्रक्रियांसाठी ती पुरवली होती. पण या साहित्यामध्ये कोबाल्ट व क्रोमिअमचे प्रमाण अधिक असून, त्याचे रुग्णांवर भीषण परिणाम झाल्याचे आढळून आले.
काही रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर कंबर व मांडीत असह्य वेदना होऊ लागल्या. धातुच्या तुकड्यांमुळे अनेकांच्या कंबरेच्या पेशी नष्ट होऊन कायमस्वरूपी अपंगत्व आले. या परिणामांची सीडीएससीओने दखल घेतली. तज्ज्ञांची समितीने या प्रकरणाचा अभ्यास केला. दोन वर्षांनी समितीने अहवाल सादर केला असून सीडीएससीओने तो स्वीकारला आहे. त्याआधारे रुग्णांना नुकसान भरपाई द्या, असे आदेश कंपनीला दिले आहेत.