खासगी रेल्वेला उशीर झाल्यास प्रवाशांना भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 05:12 AM2019-08-27T05:12:47+5:302019-08-27T05:13:03+5:30
सप्टेंबरअखेर सेवा : पहिली रेल्वे लखनौ-दिल्ली एक्स्प्रेस; प्रवाशांसाठी जागतिक दर्जाच्या सुखसोयी
नवी दिल्ली : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (आयआरसीटीसी) चालवल्या जाणाऱ्या लखनौ-दिल्ली तेजस एक्स्प्रेस या देशातील पहिल्या ‘खासगी रेल्वेला’ (प्रायव्हेट ट्रेन) तासभर उशीर झाला तर प्रवाशांना नुकसानभरपाई मिळेल. भारतीय रेल्वे आता आपल्या सेवेचा चेहरा बदलण्याच्या प्रयत्नात असून, दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेस आणि मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस या रेल्वेंना खासगी स्वरूपात चालवले जाणार असून, त्यांच्यात प्रवाशांसाठी जागतिक दर्जाच्या सुखसोयी व आरामदायी व्यवस्था असतील.
दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेस येत्या सप्टेंबरअखेर सेवेत रुजू होण्याच्या तयारीत असून, ही रेल्वे जर तासभर उशिरा आली तर प्रवाशांना त्याची काही भरपाई (पेआऊट्स) देण्याचा विचार आयआरसीटीसी करीत आहे, असे वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.
‘आम्ही दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेस चालवण्याच्या योजनांना अंतिम रूप देत असून त्यात ही रेल्वे विलंबाने आली तर प्रवाशांना काही भरपाई देण्याचा एक विचार आहे. ही भरपाई प्रवाशांच्या ई-वॉलेट्सवर काही के्रडिट किंवा भविष्यातील प्रवासात सवलत अशा स्वरूपाची असेल.
याशिवाय दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेसमध्ये जास्तीचे जेवण देण्याचाही विचार आहे. अजून काहीही अंतिम केलेले नसले तरी रेल्वे दिल्ली व लखनौत पोहोचेल तेव्हा दुसºया जेवणाची वेळ झालेली असेल. त्यामुळे टर्मिनल स्टेशनवर रेल्वे येते तेव्हा आम्ही स्नॅकसारखे जेवण वितरित करण्याच्या विचारात आहोत, असे तो म्हणाला.
या असतील सुविधा
दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेसमध्ये चहा/कॉफीच्या व्हेंडिंग मशीन्स असतील आणि प्रवाशांनी मागणी केल्यास पाण्याव्यतिरिक्त (बेव्हरिजेस) पेयही त्यांना घेता येईल.
नव्या तेजस एक्स्प्रेस रेल्वेत विमानात असतात तशा टॉयलेटची सेवा देण्याचा विचार आहे. याचा अर्थ प्रत्येक डब्यात फक्त दोनच टॉयलेटस् प्रवाशांच्या वापरासाठी असतील.
हा प्रवास दिवसाचा असून विमानात १५० प्रवाशांसाठी फक्त तीन टॉयलेटस् असतात तर तेजस एक्स्प्रेसमध्ये ७२ प्रवाशांसाठी दोन टॉयलेटस् असतील.