आम आदमी पक्षाच्या 41 आमदारांविरुद्ध भ्रष्टाचाराची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 04:41 PM2019-01-14T16:41:11+5:302019-01-14T16:41:46+5:30
सन 2017 मध्ये अँटी करप्शन विभागाकडे मंत्र्यांविरुद्धच्या 11 तक्रारी दाखल झाल्या आहेत.
नवी दिल्ली - दिल्लीतील लोकायुक्त कार्यालयास भ्रष्टाचाराच्या 41 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे या तक्रारी भ्रष्टाचारविरोधी मुद्दा घेऊन जन्माला आलेल्या आम आदमी पक्षाच्या आमदारांविरोधात आहेत. त्यामध्ये दिल्ली सरकारमधील आपच्या काही मंत्र्यांचाही समावेश आहे. गेल्या 2 वर्षात झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात या तक्रारी करण्यात आल्या आहेत.
सन 2017 मध्ये अँटी करप्शन विभागाकडे मंत्र्यांविरुद्धच्या 11 तक्रारी दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे 2008 पर्यंत भ्रष्टाचाराची एकही तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती, असे माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या उत्तरात म्हटले आहे. तर गतवर्षी याच तक्रारींची संख्या 13 असून यंदी ही संख्या 25 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे सन 2008 पासून आतापर्यंत दिल्ली सरकारमधील आमदार, मंत्री आणि अधिकाऱ्यांविरुद्धच्या तक्रारींची संख्या 229 एवढी आहे. त्यापैकी 172 तक्रारींची दखल घेऊन कारवाई करण्यात आली आहे. सन 2015 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश रेवा खेतरपाल यांना दिल्लीच्या लोकायुक्तपदी नियुक्त करण्यात आले होते. दरम्यान, न्यायव्यवस्थेचा आम्ही आदर करतो, त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या निर्णयावर आम्ही कधीही प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. याउलट या तक्रारींची दखल घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करू, असे आम आदमी पक्षाच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटींवर म्हटले आहे.