पूर्णेच्या हिरव्या पाण्यासाठी दोषींची पोलिस तक्रार करा! जलव्यवस्थापन समितीने घेतला ठराव
By admin | Published: May 6, 2014 10:07 PM2014-05-06T22:07:24+5:302014-05-07T22:17:43+5:30
पूर्णा नदीच्या पात्रात हिरवे दूषित पाणी सोडणार्या कंपन्या आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांविरुद्ध पोलिस तक्रार करण्याचा ठराव
अकोला : जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या पूर्णा नदीच्या पात्रात हिरवे दूषित पाणी सोडणार्या कंपन्या आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांविरुद्ध पोलिस तक्रार करण्याचा ठराव जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. नदीतून १३ गावांना पाणीपुरवठा होतो. दूषित पाण्यामुळे त्यापैकी तीन गावांना टँकरने पाणी पुरविण्याची वेळ आली आहे.
पूर्णा नदीतील पाणी हिरवे होण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील कंपन्या कारणीभूत असल्याचे आढळून आले. त्यामुळे दोषी कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी वारंवार प्रशासनाकडे केली आहे. त्या दृष्टिकोनातून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांना जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये उपस्थित राहण्यासाठी तीन वेळा पत्रही दिले. असे असतानाही अधिकारी सभेकडे फिरकले नाहीत. त्यामुळे आता या अधिकार्यांसोबत पाणी दूषित करण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या अमरावतीच्या चार कंपन्यांविरुद्ध पोलिस तक्रार करण्याचा ठरावच मंगळवारी जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. हा प्रस्ताव गोपाल कोल्हे यांनी मांडला होता. या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि समिती सदस्यांची उपस्थिती होती.