केरळ भवनमध्ये बीफ वाढल्याची तक्रार, पोलिसांच्या कारवाईमुळे गदारोळ
By admin | Published: October 27, 2015 12:07 PM2015-10-27T12:07:15+5:302015-10-27T13:17:48+5:30
दिल्लीतील केरळ भवनमध्ये बीफ वाढण्यात येत असल्याची तक्रार हिंदू सेनेच्या नेत्याने करताच कोणतीही अनुचित घटना टाळण्याठी पोलिस अधिका-यांनी तेथे तत्काळ धाव घेतली. मात्र पोलिसांच्या या कारवाईवरूनच गदारोळ माजला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - राजधानी नवी दिल्लीतील जंतरमंतर जवळील केरळ भवनमध्ये बीफ वाढण्यात येत असल्याची तक्रार हिंदू सेनेच्या नेत्याने करताच कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या पथकाने तेथे तत्काळ धाव घेत हॉटेलमधील डिशेसची तपासणी सुरू केली.
सोमवारी संध्याकाळी सव्वाचारच्या सुमारास हिंदू सेनेच्या कार्यकर्त्याने फोन करून केरळ भवनच्या गेस्ट हाऊसमध्ये बीफ सर्व्ह करत येत असल्याची तक्रार नोंदवली. बीफच्या मुद्यावरून देशभरात वातावण तापलेले असून त्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा -सुव्यवस्थेला धक्का लागू नये यासाठी दिल्ली पोलिसांच्या एका तुकडीने केरळ भवनमधील समृद्धी हॉटेलमध्ये जाऊन यासंदर्भात चौकशी केली. मात्र आपण गाईचे नव्हे म्हशीचे मांस विकत असल्याचे हॉटेल कर्मचा-यांनी स्पष्ट केले. त्यानंतरही दिल्ली पोलिसांचे पथक बराच वेळ तेथेच पहारा देत होते.
मात्र एका संघटनेच्या कार्यकर्त्याच्या केवळ एका फोनवरून पोलिस कोणतीही परवानगी न घेता अशी कारवाई कशी करू शकतात, असा सवाल उपस्थित होत आहे.
केरळ भवन म्हणजे काही खासगी हॉटेल नव्हे, ती सरकारच्या मालकीची वास्तू आहे,जिथे राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि इतर अधिका-यांचे वास्तव्य असते. कारवाई करण्यापूर्वी पोलिसांनी संयम राखत योग्य ती खबरदारी घ्यायला हवी होती. असे सांगत केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी दिल्ली पोलिसांच्या कृतीचा निषेध नोंदवला आहे. दिल्ली पोलिस हे दिल्ली सरकारच्या नव्हे तर केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने हे प्रकरण केंद्र सरकारसमोर मांडू, असेही ते म्हणाले
याप्रकरणी केरळ सरकार हिंदू सेनेविरोधात तक्रार नोंदवणार असल्याचेही समजते.