राहुल गांधींविरोधात भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार
By admin | Published: January 15, 2017 12:18 AM2017-01-15T00:18:27+5:302017-01-15T00:18:27+5:30
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले असल्याची तक्रार भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले असल्याची तक्रार भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
आपण देवदेवतांच्या प्रतिमा पाहतो, तेव्हा त्यात आपणास काँग्रेसचे 'पंजा' हे निवडणूक चिन्ह दिसते, असे विधान राहुल गांधी यांनी ११ जानेवारी रोजी काँग्रेसच्या जनवेदना मेळाव्यात केले होते. राहुल गांधींच्या या विधानाची सीडीच भाजपाने निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केली आहे. राहुल यांनी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाचा संबंध भगवान शंकर, गुरू नानक, गौतम बुद्ध, भगवान महावीर यांच्यांशी तसेच इस्लाम धर्माशी जोडला असून, ते लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळत आहेत, असा भाजपाच्या आरोप आहे. त्यामुळे काँग्रेसचे चिन्ह रद्द करावे आणि त्या पक्षाला असलेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्याची मागणीही भाजपाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)