राजीव गांधी यांच्याबाबत Sacred Games मध्ये आक्षेपार्ह शब्द, नवाजुद्दीन सिद्दिकीविरोधात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 05:51 PM2018-07-10T17:51:27+5:302018-07-10T18:00:23+5:30
अभिनेता सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची भूमिका असलेली नेटफ्लिक्स वेब सिरीज Sacred Games वादात अडकली आहे. गेल्या 6 जुलैला या वेब सिरिजला रिलीज करण्यात आले.
नवी दिल्ली : अभिनेता सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची भूमिका असलेली नेटफ्लिक्स वेब सिरीज Sacred Games वादात अडकली आहे. गेल्या 6 जुलैला या वेब सिरिजला रिलीज करण्यात आले. दरम्यान, या वेब सिरिजमधील एका भागात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.
पश्चिम बंगालच्या एका कॉंग्रेस कार्यकर्त्याने यासंबधी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. राजीव सिन्हा असे या कॉंग्रेस कार्यकर्त्याचे नाव आहे. राजीव सिन्हा यांनी Sacred Games च्या एका भागात राजीव गांधी यांना फट्टू हा शब्द वापरला असल्याचे म्हटले आहे. तसेच, याचे इंग्रजी सबटायटलमध्येही आक्षेपार्ह असे अनुवादन केले आहे, असे सांगत त्यांनी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि वेब सिरिजच्या निर्मात्यांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.
Sacred Games मध्ये 1980 च्या दशकातील बॅकड्राप दाखविण्यात आला आहे. नेटफ्लिक्सची Sacred Games ही वेब सिरिज विक्रम चंदा यांच्या कादंबरीवर आधारित आहे. Sacred Games ची कहानी मुंबईतील क्राइम जगताशी संबंधीत आहे. विक्रमादित्य मोटवानी आणि अनुराग कश्यप यांनी या वेब सिरिजचे दिग्दर्शन केले आहे.