VIP वागणूक दिली म्हणून काँग्रेस खासदाराने केली तक्रार
By admin | Published: July 8, 2016 01:15 PM2016-07-08T13:15:32+5:302016-07-08T13:16:28+5:30
व्हीआयपी वागणूक देण्यात आली नाही म्हणून नाराज होतील या भीतीने पुरेपूर काळजी घेण्याचा प्रयत्न करणा-या स्पाईसजेटविरोधात काँग्रेस खासदार विवेक तन्खा यांनी तक्रार केली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 08 - व्हीआयपी वागणूक देण्यात आली नाही म्हणून नाराज होतील या भीतीने पुरेपूर काळजी घेण्याचा प्रयत्न करणा-या स्पाईसजेटविरोधात काँग्रेस खासदार विवेक तन्खा यांनी तक्रार केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विवेक तन्खा यांनी व्हीआयपी वागणूक दिली यावर नाराजी व्यक्त करत तक्रार केली आहे. स्पाईसजेटचे प्रमोटर अजय सिंग यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली.
विवेक तन्खा बुधवारी जबलपूरहून दिल्लीला विमानाने प्रवास करत होते. जेव्हा विवेक तन्खा विमानतळावर पोहोचले तेव्हा बसमध्ये इतर प्रवाशांना प्रवेशासाठी परवानगी नाकारण्यात आली. फक्त एकट्या विवेक तन्खा आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकसभा सदस्याला बसमधून विमानापर्यंत नेण्यात आलं. 'आम्ही जेव्हा बसमध्ये चढलो तेव्हा अचानक प्रवाशांसाठी दरवाजे बंद करण्यात आले, आणि फक्त आम्हाला विमानापर्यंत नेण्यात आलं', अशी माहिती विवेक तन्खा यांनी दिली आहे.
विवेक तन्खा यांनी झालेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त करत स्पाईसजेटचे प्रमोटर अजय सिंग यांच्याकडे तक्रार केली आहे. 'इतर सामान्य प्रवाशाप्रमाणे खासदारही एक सामान्य प्रवासी आहे. त्यामुळे इतर प्रवाशांनी जी सेवा दिली जाते तिच त्यांनाही देण्यात यावी. कोणत्याही खासदार किंवा व्हीआयपी व्यक्तीला वेगळी वागणूक देण्याची गरज नाही असं एक खासदार म्हणून मला वाटतं', असं विवेक तन्खा बोलले आहेत.
एअरलाईन्सने यावर स्पष्टीकरण देत काही व्यक्ती व्हीआयपी वागणूक न दिल्यास नाराज होण्याची शक्यता असते. अशावेळी कोणाला विेशेष वागणूक द्यायची आणि कोणाला नाही द्यायची हे ठरवणं कठीण होतं असं सांगितलं आहे.