कामाच्या ठिकाणी लैंगिक शाेषणाच्या तक्रारी घटल्या, ‘वर्क फ्राॅम हाेम’चा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 06:04 AM2021-09-07T06:04:41+5:302021-09-07T06:05:18+5:30
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, २०२०-२१ या आर्थिक वर्षात लैंगिक शाेषणाच्या तक्रारींमध्ये ३८.२६ टक्के घट झाली आहे. या कंपन्यांकडे ४५५ तक्रारी प्राप्त झाल्या हाेत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काेराेना महामारीच्या काळात अनेक कंपन्यांनी वर्क फ्राॅम हाेमचा पर्याय दिला. अनेकांचे राेजगार त्यामुळे वाचलेच. मात्र, महत्त्वाचे म्हणजे कामाच्या ठिकाणी हाेणाऱ्या लैंगिक शाेषणाच्या तक्रारींमध्येही माेठी घट झाली आहे. लैंगिक शाेषणविराेधात काम करणाऱ्या ‘कम्लायकराे डाॅट काॅम’ने निफ्टीमध्ये नाेंदणीकृत असलेल्या ४४ कंपन्यांच्या वार्षिक अहवालाचा अभ्यास केला हाेता. त्यातून ही बाब उघड झाली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, २०२०-२१ या आर्थिक वर्षात लैंगिक शाेषणाच्या तक्रारींमध्ये ३८.२६ टक्के घट झाली आहे. या कंपन्यांकडे ४५५ तक्रारी प्राप्त झाल्या हाेत्या. त्यातुलनेत आर्थिक वर्ष २०१९-२० आणि २०१८-१९ मध्ये अनुक्रमे ७३७ आणि ७३९ तक्रारी प्राप्त झाल्या हाेत्या. महत्त्वाचे म्हणजे, बँका आणि आयटी कंपन्यांमध्ये सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कामाच्या ठिकाणी काही कर्मचारी चॅटिंग किंवा साेशल मेसेजिंगच्या माध्यमातून मर्यादा ओलांडतात. त्यातून लैंगिक शाेषणाच्या तक्रारी करण्यात येतात. महिला कर्मचाऱ्यांना काेणत्याही ठाेस कारणांशिवाय चुकीच्या वेळी बाेलाविण्यात येते.