गोध्रा तपासाची तपश्चर्या पूर्ण
By admin | Published: November 18, 2014 11:22 PM2014-11-18T23:22:55+5:302014-11-18T23:22:55+5:30
आयोगाचे सदस्य असलेले सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश न्या़ जी़टी़ नानावटी आणि उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश न्या़ अक्षय मेहता
गांधीनगर : सन २००२ च्या गुजरात दंगलीच्या तपासासाठी गठित न्या़ नानावटी आयोगाने १२ वर्षांपेक्षा अधिक काळ केलेल्या तपासाअंती तयार केलेला अंतिम अहवाल मंगळवारी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना सादर केला़ दोन हजारांपेक्षा जास्त पानांच्या अहवालासंदर्भात कुठलाही तपशील देण्यास न्या़ नानावटी यांनी नकार दिला़
आयोगाचे सदस्य असलेले सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश न्या़ जी़टी़ नानावटी आणि उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश न्या़ अक्षय मेहता यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन हा अहवाल सुपुर्द केला़
आयोगाने गोध्रा रेल्वे जळीतकांडाबाबतच्या निष्कर्षांचा एक भाग २००८ मध्ये सोपवला होता़ साबरमती एक्स्प्रेसच्या एस-६ डब्याला गोध्रा स्थानकानजीक लागलेली आग ‘नियोजित कट’ असल्याचे यात म्हटले होते़
२७ फेब्रुवारी २००२ रोजी साबरमती एक्स्प्रेसला लागलेल्या आगीनंतर गुजरातेत जातीय दंगली भडकल्या होत्या़ या दंगलीत एक हजारांवर लोक ठार झाले होते़ यात बव्हंशी अल्पसंख्यकांचा समावेश होता़ या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ३ मार्च २००२ रोजी तपास आयोग कायद्याअंतर्गत आयोगाचे गठन केले होते़ आयोगाला तपास पूर्ण करण्यासाठी २४ वेळा मुदतवाढ देण्यात आली़