शताब्दी महोत्सवाची कामे तातडीने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 04:43 AM2018-02-02T04:43:49+5:302018-02-02T04:44:21+5:30
शिर्डीच्या साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव कार्यक्रमानिमित्त करण्यात येणा-या विविध विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.
- विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिर्डीच्या साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव कार्यक्रमानिमित्त करण्यात येणा-या विविध विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.
श्री साईबाबा शताब्दी महोत्सवानिमित्त गठित करण्यात आलेल्या कृती आराखडा समितीची बैठक फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झाली. या वेळी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, आमदार स्नेहलता कोल्हे, मुख्य सचिव सुमित मलिक, मुख्यमंत्री महोदयांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त महेश झगडे, अहमदनगरचे जिल्हाधिकारी अभय महाजन, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, विश्वस्त प्रताप भोसले, भाऊसाहेब वाकचौरे, शिर्डीच्या नगराध्यक्ष योगिता शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते. अग्रवाल यांनी आतापर्यंत झालेल्या कामांचे सादरीकरण केले.
श्री साईबाबा शताब्दी महोत्सवानिमित्त शिर्डीत सुरू असलेली विकासकामे पूर्णत्वास आली आहेत. उर्वरित कामे प्रगतिपथावर असून ती तातडीने पूर्ण करावी. शिर्डी नगरपंचायतच्या हद्दीतील घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, रस्ते, मलनि:सारण व्यवस्था यासाठी साई संस्थानने निधी द्यावा. नगर पंचायतच्या अखत्यारीतील जुन्या पिंपळवाडी रस्त्याचे हस्तांतरण श्री साईबाबा संस्थानकडे करण्यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा. तसेच शिर्डी राहाता बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण होत असून उर्वरित तीन किलोमीटरच्या रस्त्याचे काम या महिनाअखेर पूर्ण करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
कृती आराखडा समितीमध्ये मंजूर केलेल्या कामांच्या प्रशासकीय मान्यतेचे अधिकार संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले.