गंगा नदीतील मृतदेहांवरील कविता रचणे म्हणजे निव्वळ ‘अराजक’, गुजरात साहित्य अकादमीच्या संपादकीयात कवयित्रीवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 06:39 AM2021-06-12T06:39:26+5:302021-06-12T06:40:25+5:30
Ganga river : ज्या लोकांनी त्या कवितेवर चर्चा केली किंवा ती इकडे तिकडे पाठवली त्यांचे वर्णन संपादकीयात ‘साहित्यिक नक्सल्स’ असे करण्यात आले आहे.
अहमदाबाद : कोरोना विषाणूची बाधा होऊन मरण पावल्याचा संशय असलेले मृतदेह गंगा नदीत वाहत आल्यानंतर त्या विषयावर गुजराती कवयित्री पारूल खाखर यांनी लिहिलेल्या कवितेवर गुजरात साहित्य अकादमीने टीका केली आहे. ही कविता म्हणजे ‘अराजक’ पसरवणे होय, अशा शब्दांत अकादमीचे अधिकृत प्रकाशन ‘शब्दसृष्टी’ने जून महिन्याच्या आवृत्तीच्या संपादकीयात म्हटले. हे मृतदेह उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंगा नदीत वाहत आल्याचे आढळले होते. ज्या लोकांनी त्या कवितेवर चर्चा केली किंवा ती इकडे तिकडे पाठवली त्यांचे वर्णन संपादकीयात ‘साहित्यिक नक्सल्स’ असे करण्यात आले आहे.
कवितेचे वर्णन संपादकीयात ‘मनात खळबळ निर्माण झाली असताना निरर्थक अस्वस्थता व्यक्त करण्यात आली आहे’ असे करण्यात आले आहे. केंद्र सरकारविरोधी आणि केंद्र सरकारच्या राष्ट्रवादी विचारसरणींच्या विरोधात असलेल्या शक्तींनी शब्दांचा गैरवापर केला आहे. तीच कविता अशा शक्तींनी टीका करण्यासाठी खांदा म्हणून वापरली. या शक्तींनी कट रचायला सुरूवात केली. या शक्तींची बांधिलकी ही भारताशी नाही तर इतर कोणाशी म्हणजे ज्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही ते डावे, तथाकथित उदारमतवादी यांच्याशी आहे.
या लोकांना भारतात ताबडतोब गोंधळ पसरावा, असे वाटते आणि ते अराजक निर्माण करतात. हे लोक सगळ्या आघाड्यांवर सक्रिय आहेत आणि त्याच पद्धतीने त्यांनी गलिच्छ हेतूंनी साहित्यात उडी घेतली आहे. साहित्यातील या नक्षलींचा हेतू हा या कवितेशी जे लोक स्वत:चे दु:ख आणि आनंद जोडतात त्या काही लोकांवर प्रभाव टाकण्याचा आहे.” गुजरातीत संपादकीयाने ‘लिटररी नक्सल्स’ असा शब्दप्रयोग केला आहे.
कविता अनेक भाषांत अनुवादित
अकादमीचे अध्यक्ष विष्णू पंड्या यांनी संपादकीय लिहिल्याला दुजोरा दिला. त्यात ‘शववाहिनी गंगा’ असा विशिष्ट उद्देशाने उल्लेख नाही पण तसा हेतू मला वाटला, असेही पंड्या म्हणाले. या कवितेची बरीच प्रशंसा झाली आणि तिचा अनेक भाषांत अनुवाद करण्यात आला आहे.