गुजरात बंदला संमिश्र प्रतिसाद
By Admin | Published: July 21, 2016 04:49 AM2016-07-21T04:49:56+5:302016-07-21T04:49:56+5:30
चार दलित तरुणांना झालेल्या क्रूर मारहाणीच्या निषेधार्थ बुधवारी देण्यात आलेल्या बंदच्या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला
अहमदाबाद : उना येथे ‘गायींचे संरक्षण’ करणाऱ्यांकडून चार दलित तरुणांना झालेल्या क्रूर मारहाणीच्या निषेधार्थ बुधवारी देण्यात आलेल्या बंदच्या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दलित पँथर सेना आणि इतर संघटनांनी दलितांवरील अत्याचारांच्या तसेच उना येथील मारहाणीच्या निषेधार्थ बंदची हाक दिली होती. या अत्याचारांच्या मुद्यावरून राज्यसभा आणि लोकसभेच्या कामकाजावर परिणाम झाला. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शुक्रवारी उना येथे भेट देणार आहेत.
येथून ३६० किलोमीटरवरील आणि राजकोटजवळील उना येथे ११ जुलै रोजी चार दलित तरुणांना स्वत:ला गायींचे संरक्षक म्हणविणाऱ्यांनी गायीच्या कथित हत्येबद्दल जबर मारहाण केली होती. मृत गायींची कातडी काढण्याचे काम त्या तरुणांकडे देण्यात आले होते. मात्र त्यांनी गाय मारली, असा आरोप करून, मारहाण केली गेली होती. याप्रकरणी चार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
त्याच्या निषेधार्थ गुजरातच्या अमरेली शहरात काढण्यात आलेल्या मोर्च्याच्या वेळी दगडफेक झाली होती आणि चार दलितांनी विष प्राशन केले होते. विष प्राशन करणाऱ्यांपैकी एकाचा मृत्यू झाल्याने प्रकरण अधिकच चिघळले. दगडफेकीत एक पोलीस कर्मचारीही मरण पावल्याचे सांगण्यात येते.
बंद काळात काही ठिकाणी रस्ते अडविण्यात आले तर काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. बंदला बहुजन समाज पक्ष आणि जन संघर्ष मंचने तसेच पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी उदयपूर येथून पाठिंबा दिला होता.
अहमदाबादेतील दैनंदिन व्यवहारांवर बंदचा परिणाम झाला नाही. मोजक्या भागातील दुकाने बंद होती. काही भागात निदर्शकांनी बंदची सक्ती करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी उना येथील मोटा समालियला (मारहाणीची घटना येथे घडली) खेड्याला भेट देऊन मारहाण झालेल्या तरुणांच्या कुटुंबियांची भेट घेतली. ज्या प्रकारे मारहाण झाली ती बघणारा कोणीही अस्वस्थ होईल, असे पटेल म्हणाल्या. राज्य सरकारने मारहाण झालेल्या चारही तरुणांना प्रत्येकी चार लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली. त्यांच्यावरील उपचारांचा खर्चही सरकारच करणार आहे. (वृत्तसंस्था)
>दलितांना संरक्षण द्या
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दलितांवर वाढत चाललेल्या अत्याचारांबद्दल बुधवारी चिंता व्यक्त करून केंद्र सरकारने दलितांची काळजी घ्यावी व त्यांना पूर्ण संरक्षण द्यावे, असे आवाहन केले. उनातील घटना ही दलितांविरुद्धचा संघटित गुन्हा आहे, असे त्यांनी टिष्ट्वटरद्वारे म्हटले.