एक सर्वंकष जीवनपद्धती
By admin | Published: June 21, 2017 02:25 AM2017-06-21T02:25:02+5:302017-06-21T02:25:02+5:30
रुग्णांसाठी ही एक चिकित्सा पद्धत तर योगींसाठी साधना पद्धत, मुक्तीचा मार्ग व जीवनात पूर्णता आणण्याचे हे साधन आहे.
- योगगुरू बाबा रामदेव
योग ही कोणत्याही धर्माची परंपरा वा अभ्यास नसून, ती वैज्ञानिक, पंथनिरपेक्ष व सर्वंकष जीवनपद्धती आहे. रुग्णांसाठी ही एक चिकित्सा पद्धत तर योगींसाठी साधना पद्धत, मुक्तीचा मार्ग व जीवनात पूर्णता आणण्याचे हे साधन आहे.
स्वातंत्र्यानंतर ७0 वर्षांनी भारताला आर्थिक विकासासोबतच आध्यात्मिक विकासालाही पुढे नेणारे पंतप्रधान मिळाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय ‘योग दिना’चा प्रस्ताव मांडला आणि १७७ देशांच्या पाठिंब्यामुळे २१ जून रोजी तो साजरा होण्यास सुरुवातही झाली. एका अर्थाने भारतीय आध्यात्मिक संस्कृतीचा जगभर होणारा हा गौरवच आहे. योगाविषयी जगभरातीय सर्व वयाच्या आणि वर्गांच्या लोकांमध्ये योगाभ्यासाविषयी उत्सुकता असून, त्यातील काही बाबींवर थोडक्यात प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न आहे.
योगाभ्यासाचे संशोधन आणि अनुभव यातून त्याचे पाच फायदे होऊ शकतात, अशा निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. ते फायदे म्हणजे, शरीराचे संपूर्ण संतुलन योगामुळे होते, निकामी झालेल्या पेशी पुन्हा सक्रिय होतात, मनुष्यामध्ये ५ टक्क्यांपर्यंतच सामर्थ्य वा शक्ती जागृत अवस्थेत निर्माण होते.
अन्य शक्ती वा सामर्थ्य सुप्त अवस्थेत मिळत असते. योगामध्ये सुप्त ज्ञानशक्ती व अन्य दिव्य शक्ती जाग्या होतात. नरापासून नारायण, जिवापासून ब्रह्म, मानवापासून महामानव बनवणारे योग हे आध्यात्मिक विज्ञान आहे. योगामुळे अशुभ व अज्ञान यांचा हळूहळू क्षय होत जातो आणि विवेक, शुभ व निरंतर उदय यांचा विकास होऊ लागतो.
शरीरातील आणि चित्तातील विकार मुळापासून नष्ट करण्याची ताकद योगामध्ये आहे. दिव्य ज्ञान, दिव्य प्रेम, करुणा, वात्सल्य, दिव्यशक्ती, सामर्थ्य हे सारे योगातून प्राप्त करता येते.
योगीच्या जीवनात, जे नियमित व श्रद्धेने योग, प्राणायाम, ध्यानधारणा करतात, त्यांच्या जीवनात १० महासत्यांचा समावेश होतो. योगी कधीही हिंसा, असत्य, अब्रह्मचर्य, असंयम, लालूच, कृतघ्नता यांना बळी पडत नाही आणि त्याच्या जीवनात अपवित्रता, असंतोष, अकर्मण्यता, आत्मविमुखता व नास्तिकता यांना स्थान नसते. योगी अष्टांग योगाचे पालन करतात, आपल्या जीवनात त्याचे आचरण करतात.
जगाची लोकसंख्या सुमारे ७00 कोटी आहे. त्यापैकी १ टक्के लोक जरी योगी झाले, तर सारे जग अतिशय सुंदर, समृद्ध व शांत होईल. कारण एका योगीच्या आत्म्यामध्ये लाखो लोकांपेक्षा अधिक सामर्थ्य व दिव्यता असते. स्वास्थ्य, सौंदर्य, सामर्थ्य, शक्ती, समृद्धी स्थायी सुख, सफलता या प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत आकांक्षा असतात. योगाद्वारे त्या पूर्ण होऊ शकतात, तसेच योगामुळे उत्पादकता, सृजनात्मकता, सकारात्मकता येते. तो न्यायपूर्ण व्यवहार करण्यात उद्युक्त होतो.
म्हणजेच योगा हे मनुष्याचा बाह्य व आंतरिक विकास घडवून आणण्याचे सर्वांगीण साधन वा माध्यम आहे, असेच म्हणता येईल. रोगमुक्त, मणावमुक्त, व्यसनमुक्त राहण्यासाठी आणि आयुष्यात सौख्य, समृद्धी व शांतता आणण्यासाठी सकाळी वा संध्याकाळी एक तास योगासाठी देणे आवश्यक आहे. तसे जे करतात, त्यांच्या जीवनातील प्राधान्ये आपोआपच पूर्ण होऊ लागतात.
समत्वं योग उच्यते,
योग कर्मसु कौशलम!