मदरशांमध्ये संगणक, गणिताचे धडे
By admin | Published: July 3, 2015 10:22 PM2015-07-03T22:22:55+5:302015-07-03T23:51:42+5:30
अनुदान नाही : शहरात सुमारे पंधराशे विद्यार्थी घेताहेत शिक्षण
अनुदान नाही : शहरात सुमारे पंधराशे विद्यार्थी घेताहेत शिक्षण
नाशिक : राज्यातील मदरशांमध्ये विज्ञान, गणित व समाजशास्त्राचे शिक्षण देण्याचा मुद्दा सध्या गाजत असला, तरी शहरातील प्रमुख मदरशांमध्ये आतादेखील संगणक, गणित व इंग्रजीचे धडे दिले जात आहेत; मात्र यांतील एकाही मदरशाला शासकीय अनुदान मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे.
धार्मिक शिक्षणाव्यतिरिक्त मुलांना नव्या विषयांचे शिक्षण न देणार्या मदरशांना शासकीय अनुदान दिले जाणार नसल्याचा तसेच या मदरशात शिकणार्या मुलांना शाळाबा म्हणून गणले जाणार असल्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील मदरशांची माहिती घेतली असता, शहरात तीन प्रमुख निवासी मदरसे आहेत. घासबाजार येथील शाही मशिदीत दारुल उलूम जमिया अहैले सुन्नत, कोकणीपुरा येथील दारुल उलूम गौसे आझम व वडाळागाव येतील दारुल उलूम गौसिया फैजाने मदार यांचा त्यात समावेश आहे. या मदरशांमध्ये प्रत्येकी सुमारे पन्नास विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांच्या निवासाची, भोजनाची व्यवस्था मोफत केली जाते. त्यांत परराज्यांतील विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे. वयाच्या बारा वर्षांपासूनच्या पुढच्या मुलांना तेथे पूर्णवेळ धार्मिक शिक्षण दिले जाते. तसेच संगणक, गणित व इंग्रजीही शिकवले जाते. तेथे जास्तीत जास्त पंधरा वर्षे शिक्षण घेता येते. अलीम, कारी, हाफीज, मुफ्ती अशा पदव्या तेथे दिल्या जातात. या पदव्या घेणारी व्यक्ती मशिदीत धर्मगुरू म्हणून काम पाहू शकते. याशिवाय जुने नाशिक, वडाळागाव परिसरात सुमारे दहा लहान मदरसे आहेत. त्यांत दोन फक्त महिलांसाठीच्या मदरशांचाही समावेश आहे. या सर्व मदरशांमध्ये सकाळी व सायंकाळी दोन तास धार्मिक शिक्षण दिले जाते. या मदरशांमध्ये जाणारे विद्यार्थी अन्य शाळा-महाविद्यालयांतून प्रचलित शिक्षणही घेतात. शहरातील सुमारे बारा ते पंधरा नोंदणीकृत मदरशांमधून सुमारे पंधराशे ते सतराशे विद्यार्थी शिक्षण घेतात; मात्र त्यांना शासनाकडून अनुदान मिळत नाही. हे सर्व मदरसे समाजबांधवांच्या देणग्यांवर चालतात, असे सूत्रांनी सांगितले.
जोड आहे...