संस्कृत भाषेवर भविष्यात चालणार संगणक, आयआयटी दीक्षान्त समारंभात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांची मुक्ताफळे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 05:58 AM2019-08-11T05:58:04+5:302019-08-11T05:58:55+5:30

आयआयटी मुंबईच्या ५७ व्या दीक्षान्त समारंभात शनिवारी व्यासपीठावर चेतन भगतच्या पुस्तकावर आधारित ‘३ इडियट्स’ चित्रपटातील चतुर रामलिंगमच अवतरला की काय असा प्रत्यय विद्यार्थ्यांना आला.

Computer will work on Sanskrit in Future - HRD Minister Ramesh Pokhriyal | संस्कृत भाषेवर भविष्यात चालणार संगणक, आयआयटी दीक्षान्त समारंभात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांची मुक्ताफळे

संस्कृत भाषेवर भविष्यात चालणार संगणक, आयआयटी दीक्षान्त समारंभात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांची मुक्ताफळे

Next

मुंबई : आयआयटी मुंबईच्या ५७ व्या दीक्षान्त समारंभात शनिवारी व्यासपीठावर चेतन भगतच्या पुस्तकावर आधारित ‘३ इडियट्स’ चित्रपटातील चतुर रामलिंगमच अवतरला की काय असा प्रत्यय विद्यार्थ्यांना आला. दीक्षान्त समारंभाच्या कार्यक्रमात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल (निशंक) यांच्या वक्तव्यांवर आयआयटीच्या विद्यार्थ्यांना हसू आवरता येत नव्हते. संस्कृत ही वैज्ञानिक भाषा असून भविष्यात संस्कृत भाषेतील आज्ञावलीच्या आधारे संगणकही चालू शकतील; आणि असे चक्क ‘नासा’ने मान्य केल्याचे वक्तव्य त्यांनी केले. याशिवाय भविष्यात जगात कुठेही रुग्णालय सुरू करायचे असल्यास आयुष आणि आयुर्वेदाला प्राधान्य असणार असून रुग्णचिकित्सा या दोन शास्त्रांच्या आधारे होईल असा युक्तिवादही त्यांनी केला.

मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा (आयआयटी मुंबई) ५७ वा दीक्षान्त सोहळा शनिवारी आयआयटी मुंबईच्या दीक्षान्त सभागृहात पार पडला. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल (निशंक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी त्यांचे प्रमुख भाषण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील पाच वर्षांत भारताला शिक्षण क्षेत्राला जागतिक नेतृत्व म्हणून प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे निशंक या वेळी म्हणाले.
यामागे युवा पिढीची भूमिका किती महत्त्वाची आहे? योग आज आंतरराष्ट्रीय स्तरावर कसा पोहोचला आहे? त्यासाठी मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद कसा साधायला हवा, हे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर पूर्वी पतंजलीबाबत चांगले न बोलणारे १९९ देशांतले लोक आता या तन आणि मनाचे योग्य संतुलन राखण्यासाठी आपल्या पतंजलीला मानत आहेत, असे ते म्हणाले.

या वेळी त्यांनी हॉस्टेल क्र. १८ चे उद्घाटन केले आणि आयआयटी संकुलात वृक्षारोपण केले. नॅशनल नॉलेज नेटवर्कच्या माध्यमातून त्यांनी
सर्व आयआयटींच्या विद्यार्थ्यांशी ‘नवभारत का निर्माण, आयआयटी के साथ’ या विषयावरथेट संवाद साधला. नवभारताच्या विकासात योगदान देण्याचे आणि देशाला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचे आवाहनदेखील त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

सुंदर पिचार्इंबाबतही दिली चुकीची माहिती
गुगल सीईओ सुंदर पिचाई, नारायण मूर्ती, चेतन भगत हे या आयआयटी मुंबईतून शिकल्याची चुकीची माहितीही केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी भाषणात दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कुजबुज आणि विनोदाची कारंजी फुटत होती.

आयआयटीच्या श्रीवत्सन श्रीधरचा राष्ट्रपती पदकाने सन्मान
 
मुंबई : आयआयटी मुंबईचा ५७ वा दीक्षान्त समारंभ शनिवारी आयआयटी मुंबईच्या दीक्षान्त सभागृहात पार पडला. या वेळी आयआयटीच्या इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असलेला श्रीवत्सन श्रीधर याला शनिवारी राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले.
या वर्षी पदवी प्रदान करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ३०१ पीएच.डी., २७ दुहेरी पदवी (एमटेक / एमफिल + पीएच.डी.) आणि ३५ दुहेरी पदवी (एमएस्सी+पीएच.डी.) विद्यार्थी आहेत. यापैकी ३८ संशोधक विद्यार्थ्यांची २०१७-१९ वर्षासाठी पीएच.डी. संशोधनात सर्वोत्कृष्ट म्हणून निवड करण्यात आली. शिवाय २३ संयुक्त पीएच.डी. पदव्या मोनाश विद्यापीठाच्या सहकार्याने प्रदान केल्या. कुलगुरू, मोनाश विद्यापीठाचे अध्यक्ष प्रा. मार्गारेट गार्डनर यांनी हे पुरस्कार प्रदान केले.
याशिवाय १२ एमएस (संशोधन), ६ दुहेरी पदव्या (एमसीएस्सी +एमटेक), ५७६ एमटेक, ५६ एमडी, २७ एमफिल, ११० मॅनेजमेंट, २२६ दोन वर्षे एमएस्सी पदव्याही प्रदान केल्या.या वर्षी ४ विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी सुवर्णपदकाने गौरविले. इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचा श्रीवत्सन श्रीधर याला राष्ट्रपती पदकाने गौरविले. तर, शशांक ओबला याला इन्स्टिट्यूट गोल्ड मेडल (२०१७-१८) तसेच रिभू भट्टाचार्य याला (२०१८-१९) साठी ‘इन्स्टिट्यूट गोल्ड मेडल देण्यात आले. डॉ. शंकर दयाळ शर्मा सुवर्णपदक धृती शाहला दिले.
इन्फोसिकनॉस टेक्नॉलॉजी लि.चे सहसंस्थापक व अध्यक्ष, केंद्राच्या विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष नंदन निलेकणी यांना सामाजिक विकास, तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.

पदकप्राप्त मराठी चेहरे
आयआयटी मुंबईत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध पदके देऊन सन्मानित केले जाते. यंदा ४४ जणांना विविध पदकांनी सन्मानित करण्यात आले. यात अनिष कुलकर्णी, प्रणव कुलकर्णी, प्रतीक मापुसकर, अनिकेत वझे या मराठी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

जागतिक दर्जाची संस्था
आयआयटी मुंबई ही जागतिक दर्जाची संस्था आहे. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी सर्वाधिक पसंतीचे ठिकाण आहे. देशातील २३ आयआयटीमध्ये जेईई २०१९ मधील अव्वल ५० पैकी ४७ तर १०० पैकी ६३ विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईत प्रवेश घेतला आहे.
- प्रा. शुभाशिष चौधरी, संचालक,
आयआयटी बॉम्बे


खूप चांगला अनुभव
आयआयटी मुंबईतील पाच वर्षे हा खूप चांगला अनुभव होता. तंत्रज्ञानाच्या मदतीने समस्या सोडविता येतात याचा अनुभव इन्फोसिस आणि आधार प्रकल्पावर काम करताना आला.
- नंदन निलेकणी, सह संस्थापक व अध्यक्ष, इन्फोसिकनॉस टेक्नॉलॉजी लि.

Web Title: Computer will work on Sanskrit in Future - HRD Minister Ramesh Pokhriyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.