संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी, कष्टकऱ्यांचे नेते कॉ. कृष्णा मेणसे यांचे निधन
By विश्वास पाटील | Updated: January 13, 2025 18:43 IST2025-01-13T18:28:20+5:302025-01-13T18:43:42+5:30
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तब्बल ११ महिन्याहून अधिक काळ त्यांनी कारावास भोगला

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी, कष्टकऱ्यांचे नेते कॉ. कृष्णा मेणसे यांचे निधन
कोल्हापूर: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी, कामगार कष्टकऱ्यांचे नेते कॉ. कृष्णा मेणसे यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी बेळगाव येथे निधन झाले. कॉम्रेड मेणसे हे गेली ७० वर्षाहून काळ श्रमिक, कष्टकरी, कामगार, शेतमजूर यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष केला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांना तुरुंगवास झाला होता. तब्बल ११ महिन्याहून अधिक काळ त्यांनी कारावास भोगला होता.
भाषावर प्रांत रचनेनंतर कर्नाटकात अडकलेल्या बिदर, भालकी, बेळगाव, कारवार या प्रदेशातील मराठी भाषिक जनतेच्या भाषिक स्वातंत्र्याच्या लढ्यात ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. सीमा लढा, कामगार कष्टकऱ्यांची आंदोलने करीत असताना पत्रकार म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. हेमंत या मासिका बरोबर साम्यवादी हे साप्ताहिक सुरु करून कष्टकऱ्यांच्या लढ्याला त्यांनी माध्यमात आणले.
याबरोबर त्यांनी विपुल लेखन केले आहे. हो ची मिन्ह, बसवेश्वर ते ज्ञानेश्वर, गोटलेली धरती पेटलेली मने, असा लढलो असा घडलो, डॉ आंबेडकर आणि बुध्दधर्म, अशा तोडल्या बेड्या यासारख्या अनेक वैचारिक पुस्तकांचे लिखाणही त्यांनी केले आहे. सत्यशोधक विचारांचा त्यांच्या जडणघडणीवर मोठा प्रभाव राहिला. राष्ट्रवीरकार शामराव देसाई यांच्या सोबत बेळगाव परिसरात सत्यशोधक विचाराच्या प्रचार आणि प्रसारात ते पुढाकारात राहिले होते. विद्यार्थी आणि तरुण वयात कुस्तीपट्टू म्हणून त्यांचा बेळगाव परिसरात नावलौकिक होता.