‘कॉम्रेड’, ‘लाल सलाम’; आसामच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध फेसबुकवर तीव्र रोष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 02:18 AM2020-06-09T02:18:41+5:302020-06-09T02:18:55+5:30
शेतकरी नेते गोगोई यांच्याविरुद्ध देशद्रोहाच्या आरोपामुळे प्रतिक्रिया
गुवाहाटी : शेतकरी नेते अखिल गोगोई यांच्याविरोधात ‘एनआयए’मार्फत देशद्रोह आणि दहशतवादी कारवायांविषयीचे आरोपपत्र दाखल केल्यामुळे आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याविरोधात समाजमाध्यमांवर तीव्र रोष व्यक्त होत आहे. सोनोवाल यांना ‘कॉम्रेड’ म्हणत ‘लाल सलाम’ करण्यात येत आहे. फेसबुकवर ते अधिक ट्रोल होत आहेत. काही दिवसांपूर्वी एनआयएने गोगोई आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात म्हटले आहे की, गोगोई यांना ‘कॉम्रेड’ म्हणून ‘लाल सलाम’ केला जात होता. या दोन्ही संबोधनावरून गोगोई हे राष्ट्रविरोधी आणि दहशतवादी कारवायांत सहभागी असल्याचे स्पष्ट होते.
आरोपपत्रातील तपशील बाहेर आल्यानंतर लोकांनी सोनोवाल यांनाही ‘कॉम्रेड आणि ‘लाल सलाम’ असे संबोधित करून तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ४ जूनपासून मुख्यमंत्री सोनोवाल यांच्याविरुद्ध टीका सुरू झाली. मागील दोन-तीन दिवसांत टीका अधिक तीव्र झाली आहे. सोनोवाल यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर ‘कॉम्रेड’, ‘लाल सलाम’, ‘इन्क्लाब जिंदाबाद’ आणि व्लादिमीर लेनिन यासारख्या कम्युनिस्ट विचारांचा संदर्भ दिला जात आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) २९ मे रोजी गोगोई आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आसामात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरुद्ध हिंसक आंदोलन झाले होते. या आंदोलनात गोगोई यांची सक्रिय भूमिका होती, असा आरोप ठेवण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध देशद्रोह आणि दहशतवादी कारवायांची कलमे लावण्यात आली आहेत. आरोपपत्रातील तपशील जाहीर झाल्यानंतर सोनोवाल यांच्या फेसबुक पेजवर विभिन्न प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली.
एका व्यक्तीने लिहिले की, ‘आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी’ आहोत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आम्ही स्वातंत्र्यसैनिकांना समर्थन दिले होते. आरएसएस आणि भाजपने मात्र इंग्रजांना साथ दिली होती.’
कॉम्रेड संबोधतात म्हणून देशद्रोही
च्आरोपपत्रात म्हटले आहे की, गोगोई आणि त्यांच्या साथीदारांनी कम्युनिस्ट जाहीरनामा, मार्क्स आणि माओच्या जीवनाचा उल्लेख केला आहे. ते मित्रांना कॉम्रेड संबोधतात तसेच अभिवादनासाठी लाल सलाम म्हणतात. यावरून त्यांचे प्रतिबंधित भाकपा (माओवादी) या संघटनेशी संबंध असल्याचे स्पष्ट होते.