हिंदू धर्माच्या संकल्पना सोप्या भाषेत याव्यात!
By admin | Published: September 12, 2016 01:34 AM2016-09-12T01:34:16+5:302016-09-12T01:34:16+5:30
आयुर्वेद आणि योगसाधनेत आगामी काळात जगात भारत प्रथम क्रमांकावर असेल यात शंका नाही. आधुनिक काळात भारताची वैदिक संस्कृती, परंपरा व हिंदु धर्माच्या आद्य संकल्पनांचे साऱ्या जगासमोर
सुुरेश भटेवरा, नवी दिल्ली
आयुर्वेद आणि योगसाधनेत आगामी काळात जगात भारत प्रथम क्रमांकावर असेल यात शंका नाही. आधुनिक काळात भारताची वैदिक संस्कृती, परंपरा व हिंदु धर्माच्या आद्य संकल्पनांचे साऱ्या जगासमोर सोप्या व सरळ शब्दात व आकर्षक सादरीकरण झाले पाहिजे, असे आवाहन केंद्रीय रस्ते व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथे केले.
आळंदी येथील विश्व शांती केंद्र, इंडिया इंटरनॅशनल मल्टिव्हर्सिटी आणि डॉ. विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वाखालील विविध संस्थांतर्फे समन्वय महर्षी संत गुलाबराव महाराज जीवन शताब्दी महोत्सवानिमित्त येथील विज्ञान भवनात आयोजित ९ व्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळयात प्रमुख अतिथी या नात्याने गडकरी बोलत होते.
शिकागोच्या धार्मिक परिषदेचा संदर्भ देत गडकरी म्हणाले, स्वामी विवेकानंद केवळ हिंदु धर्माची महत्ता कथन करण्यासाठी शिकागोला गेले नव्हते तर वसुधैव कुटुंबकम् या आद्य तत्वज्ञानाचा पुरस्कार करीत, हिंदु धर्मात विश्व धर्माच्या संकल्पनेचा अंतर्भाव असल्याचे साऱ्या जगाला त्यांनी आत्मविश्वासाने सांगीतले.
संत गुलाबराव महाराजांबद्दल यांच्या कार्याचा गौरव करताना त म्हणाले, गुलाबरावांचे चिंतन हा ज्ञानाचा महासागर आहे. संत ज्ञानेश्वरांना गुरू मानणाऱ्या गुलाबरावांनी विश्वकल्याणाचे आयुष्यभर जे चिंतन केले ते साऱ्या मानव जातीला प्रेरणादायी आहे. जगभर त्याचा प्रसार झाला पाहिजे, हे कार्य कराड व त्यांच्या सहकाऱ्यांनी सिध्दीस नेले पाहिजे असे आवाहनही गडकरींनी केले. इंडिया इन्टरनॅशनल मल्टिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. विजय भटकर याप्रसंगी म्हणाले, समन्वयाचा विचार भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, भारत त्याच्या बळावर साऱ्या जगाचा विश्वगुरू बनू शकतो.
नारायण महाराज मोहोळ यांनी गुलाबराव महाराजांचे अभंग, पदे, गीते ,श्लोक आदी साहित्यकृतींचे भाषांतर जगातल्या विविध भाषांमधे करून जगभर त्याचा प्रसार करण्याचा संकल्प जाहीर केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटन सोहळयास उपस्थित राहू शकले नाहीत. तथापि या सोहळयात बंगलुरूच्या मानव एकता मिशनचे अध्यक्ष महायोगी मधुकरनाथजी यांचेही भाषण झाले. स्वागत व प्रास्ताविक डॉ. विश्वनाथ कराड यांनी केले.
भारत हा जगाच्या पाठीवर एकमेव देश असा आहे की जो आपल्या देशाला मातेसमान मानतो. जागतिक व्यासपीठांवर भारताला इंडिया संबोधणे उचित नाही. पंतप्रधान मोदींनी यापुढे जयहिंद ऐवजी ‘भारतमाता की जय’ ही घोषणा जगभर बुलंद केली तर देशाच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर होईल. -आचार्य धर्मेंद्र महाराज, जयपूरचे पंचपिठाधीश्वर
सर्व धर्मांमध्ये मानवतेलाच सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. जनावरे एकमेकांंवर हल्ला करतात मात्र परस्परांचा शक्यतो जीव घेत नाहीत. सध्याच्या काळात माणसांचे आचरण इतक्या खालच्या स्तरावर गेले आहे की इतरांचे प्राण घेतल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. आपण सारे मानव आहोत तेव्हा आपले जीवन मानवजातीच्या मूळ संस्कारांचे प्रतीक बनवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.
-श्री अन्सारी चतुर्वेदी, वेद, उपनिषद, भगवद्गीता व कुराणाचे गाढे अभ्यासक
देशातल्या साधुसंतांनी धर्म जाती पंथांमधले भेदाभेद नष्ट केले. समाज मनातून स्पृश्य अस्पृश्यतेचा विचार पुसून टाकला तर अयोध्येतले राम मंदीर, मशीद यासारख्या वादाचे प्रश्न उद्भवणारच नाहीत. रोटी तोडून खावी लागते तर खिचडी मिसळून खाल्ली जाते. समाजाचे विभाजन आपल्याला पुन्हा पराधिनतेकडे नेईल. याचे सर्वांनी भान ठेवले पाहिजे. -डॉ. रामविलास वेदांती, अध्यक्ष,
रामजन्मभूमी न्यास, अयोध्या