समारोपालाही रंगले मानापमान नाट्य
By Admin | Published: August 12, 2016 12:04 AM2016-08-12T00:04:56+5:302016-08-12T01:05:01+5:30
लोकप्रतिनिधी आखाड्यांची नाराजी
लोकप्रतिनिधी आखाड्यांची नाराजी
नाशिक : दर बारा वर्षांनी येणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सांगतेलाही शुभारंभाप्रमाणेच मानापमान व नाराजी नाट्याला सामोरे जावे लागले.
व्यासपीठावर ठरावीक आखाड्यांच्या महंतांनाच बोलाविल्याने अन्य आखाड्यांच्या काही महंतांनी नाराजी व्यक्त केली. तर पंचायत समिती स्तरावरील लोकप्रतिनिधींना डावलल्याने त्यांनीही नाराजी व्यक्त केली. सिंहस्थ कुंभमेळ्याची सांगता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेली असताना त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या वतीने दुपारनंतर कुशावर्ताच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले. अगदी सायंकाळी कुशावर्तावर विद्युत रोषणाई करण्यात आली. मुख्य समारंभ सुरू होण्यापूर्वी अगदी काही मिनिटे अगोदर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या वतीने नगरसेवकांना पासेसचे वितरण करण्यात आले. त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे उपसभापती शांताराम मुळाणे यांनी तर जाहीरपणे नाराजी व्यक्त करताना सांगितले की, सिंहस्थात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची यंत्रणा राबलेली असताना ना जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांचा सत्कार झाला ना त्र्यंबकेश्वर पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. तसेच पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधींना सन्मानाने व्यासपीठावर बसविण्याऐवजी समोरील बाजूस बसविण्यात आले. अग्नी आखाड्याचे महंत ब्राचारी अभियानानंद यांनी सांगितले की, सर्व दहाही आखाड्यांना निमंत्रण दिलेले असले तरी, ठरावीक आखाड्यांच्या महंतांनाच व्यासपीठावर बसविण्यात आले. चार ते पाच व्यक्तींना व्यासपीठावर बसवून सोहळा कसा होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. अशाच काही प्रतिक्रिया काही महंत व लोकप्रतिनिधींनी व्यक्त केल्याने शुभारंभाला जसे साधूंचे मानापमान नाट्य रंगले, थेट शाही स्नानावर महंतांनी जसा बहिष्कार टाकण्याचा इशारा देऊन प्रशासनाची जशी धावपळ उडविली होती तसेच सिंहस्थाच्या समारोपालाही मानापमान नाट्य रंगल्याचे पहावयास मिळाले. (प्रतिनिधी)