उत्तराखंडमध्ये भाजपा सरकार, मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग यांचा शपथविधी संपन्न

By admin | Published: March 18, 2017 03:28 PM2017-03-18T15:28:19+5:302017-03-18T15:28:19+5:30

उत्तराखंडचे माजी प्रदेशाध्यक्ष त्रिवेंद्र सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे

Concluding the oath of office by the BJP government, Chief Minister of Uttarakhand, Trivendra Singh | उत्तराखंडमध्ये भाजपा सरकार, मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग यांचा शपथविधी संपन्न

उत्तराखंडमध्ये भाजपा सरकार, मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग यांचा शपथविधी संपन्न

Next
ऑनलाइन लोकमत
डेहराडून, दि. 18 - उत्तराखंडचे माजी प्रदेशाध्यक्ष त्रिवेंद्र सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर भाजपा सरकारचा शपथविधी शनिवारी पार पडला. शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. राज्यपाल के के पॉल यांनी त्रिवेंद्र सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. 70 जागांच्या विधानसभेत भाजपाने 57 जागा जिंकत एकहाती विजय मिळवला आहे. डेहराडूनमधील परेड मैदानावर रावत यांचा शपथविधी पार पडला.
 
उत्तराखंडमध्ये मुख्यंमत्री म्हणून भाजपाने त्रिवेंद्र सिंग रावत यांचे नाव निश्चित केल्यानंतर उत्तर प्रदेशात भाजपाचा विधिमंडळ पक्षनेता निवडण्यासाठी आमदारांची बैठक शनिवार होत आहे. उत्तराखंडमध्ये रावत यांचा शपथविधी शनिवारी झाला असून, उत्तर प्रदेशात नवे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा रविवारी शपथविधी होईल. तथापि, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचा ‘सस्पेन्स’ कायम आहे.
 
उत्तराखंडमधील भाजपा आमदारांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून त्रिवेंद्र सिंग रावत यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आलेले रावत हे राज्याचे आठवे मुख्यमंत्री असतील. बैठकीत प्रकाश पंत यांनी रावत यांचे नाव सुचविले आणि सत्पाल महाराज यांनी त्यास अनुमोदन दिले. पंत व सत्पाल महाराज हे दोघे मुख्यमंत्रीपदाचे इच्छुक होते. 
 
त्रिवेंद्र रावत (57) वर्षांचे असून त्यांनी डोईवाला विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या हीरा सिंह बिश्त यांचा 24 हजार मतांच्या फरकाने पराभव केला. डोईवाला विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सलग तिस-यांदा विजय मिळवला. 2002 पासून ते इथून निवडणूक लढवत आहेत. रावत ठाकूर नेते आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांची नाळ जोडलेली असल्याने मुख्यमंत्रीपदाचे ते प्रबळ दावेदार होते. 
 
 राजकारणात येण्यापूर्वी 1983 ते 2002 ते आरएसएस प्रचारक होते. संघात त्यांनी महत्वाची पदे भूषवली आहेत. पत्रकारीतेची पदवी असलेले रावत यांचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चांगले संबंध आहेत. 2014 लोकसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली उत्तरप्रदेशात जबाबदारी संभाळली आहे. झारखंडचीही जबाबदारी त्यांच्याकडे असताना तिथे विधानसभा निवडणुकीत पक्षाला विजय मिळाला. 
 
उत्तर प्रदेशातून विभक्त झाल्यानंतर उत्तराखंड विधानसभेची ही चौथी निवडणूक झाली. 70 सदस्यांच्या या विधानसभेत आजवर कोणत्याही पक्षाला 40 पेक्षा अधिक जागा कधी मिळाल्या नव्हत्या. भाजपाला यंदा 57 जागा मिळाल्या तर काँग्रेसला अवघ्या 11 जागांवर समाधान मानावे लागले. उत्तराखंडात भाजपने मुख्यमंत्रिपदाचा दावेदार जाहीर केला नव्हता. तथापि कोणत्याही स्थितीत हे राज्य आपल्या ताब्यात यावे, यासाठी भाजपाची व्यूहरचना वर्षभरापासून चालली होती.   
 

Web Title: Concluding the oath of office by the BJP government, Chief Minister of Uttarakhand, Trivendra Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.