निषेधाचे सूर तीव्र; आणखी सहा लेखकांचा एल्गार
By admin | Published: October 15, 2015 11:36 PM2015-10-15T23:36:17+5:302015-10-15T23:36:17+5:30
देशातील वाढती असहिष्णुता, वाढता तणाव आणि जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर साहित्यविश्वातून उमटत असलेले निषेधाचे सूरगुरुवारी अधिकच तीव्र झाले.
नवी दिल्ली : देशातील वाढती असहिष्णुता, वाढता तणाव आणि जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर साहित्यविश्वातून उमटत असलेले निषेधाचे सूरगुरुवारी अधिकच तीव्र झाले. राजस्थानातील प्रसिद्ध लेखक नंद भारद्वाज, इंग्रजीचे सुप्रसिद्ध कवी केकी एन. दारूवाला यांच्यासह आणखी सहा साहित्यिकांनी आपले अकादमी पुरस्कार परत केले. याचसोबत अकादमी पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांची संख्या ३३ झाली.
नंद भारद्वाज, केकी एन. दारूवाला यांच्यासह प्रसिद्ध कन्नड लेखक के.वीर. भद्रप्पा, के. नीला, आर. के. हुदुंगी तसेच काशीराम अम्वालजी यांनी आपले साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याचे जाहीर केले. या सर्व लेखकांनी अकादमीला पत्र लिहून देशातील वाढती असहिष्णुता आणि जातीय तणावावर चिंता व्यक्त केली.
ज्ञानपीठ विजेत्यांचे समर्थन
ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ हिंदी कवी कुंवर नारायण तसेच केदारनाथसिंह गुरुवारी अकादमी पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले. तसेच अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक काशीनाथ सिंह आणि अरुण कमल यांनी पुरस्कार परत करण्याऱ्या लेखकांना पाठिंबा दर्शवला.
राष्ट्रपतींना साकडे
कोलकाता : दादरी हत्याकांड आणि पुरोगामी विचारवंतांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ एकजूट होत पश्चिम बंगालचे ९० लेखक व बुद्धिजीवींनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पत्र लिहून त्यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी विनंती केली आहे.
एम.एम. कलबुर्गी, नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे या विचारवंतांच्या हत्या आणि दादरी हत्याकांडप्रकरणी सरकारची उदासीनता दहशत निर्माण करणारी आहे, असे या लेखकांनी पत्रात लिहिले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
नवी दिल्ली: पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी आपल्या ब्लॉगमधून सडकून टीका केली. इकलाखची हत्या ही दु:खद घटना आहे. पण लेखकांनी पुरस्कार परत करणे ही वैचारिक असहिष्णुता नाही का? डावे आणि नेहरूवादी विचारसरणीचे लोक मोदी सरकारसोबत जुळवून घेऊ शकलेले नाहीत. त्यातूनच भाजप व मोदी सरकारविरोधात ‘खोटा कागदोपत्री विरोध’ नोंदविण्याचे काम सुरू आहे. मोदी सरकारविरुद्ध सुरू असलेले हे दुसऱ्या प्रकारचे राजकारण आहे, असे जेटलींनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे.