Coronavirus:…तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची परिस्थिती सांगणं कठीण; तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 07:25 AM2021-08-03T07:25:58+5:302021-08-03T07:28:37+5:30
केरळमध्ये दुसऱ्या राज्यांप्रमाणे निर्बंधाचा भार होता. याठिकाणी वारंवार लोक निर्बंध हटवण्याची मागणी करत होते.
नवी दिल्ली – देशात बऱ्याच राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट शांत झाली आहे. तर केरळ आणि महाराष्ट्रात आजही देशातील सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्ण आढळत आहेत. केरळमध्ये दिवसाला २० हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. राज्यात संक्रमण वाढत असल्यानं विजयन सरकारवर अनेक स्तरातून टीका होत आहे. परंतु देशातील टॉप वायरोलॉजिस्ट डॉ. गगनदीप यांनी संक्रमणासाठी राज्यावर टीका करणं योग्य नाही असं म्हटलं आहे.
डॉ. गगनदीप म्हणाले की, रुग्णसंख्या वाढल्याने राज्याला जबाबदार धरणं योग्य नाही. परंतु राज्यात कमी लसीकरण दर, लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्तीची कमतरता, निर्बंधांमध्ये सूट या गोष्टी संक्रमण वाढीसाठी प्रमुख कारण असू शकतात. केरळमध्ये दुसऱ्या राज्यांप्रमाणे निर्बंधाचा भार होता. याठिकाणी वारंवार लोक निर्बंध हटवण्याची मागणी करत होते. परंतु निर्बंधांमध्ये सूट देण्याची ही वेळ नाही. केरळमध्ये ओणम उत्सव पूर्वीसारखा साजरा केला जाऊ शकत नाही. आता लोकांना सतर्क राहणं गरजेचे आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच केरळमध्ये एक वेळ कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावली होती परंतु कोरोना लसींच्या अभावी पुन्हा यात वाढ झाली. लसींचा पुरवठा करण्याबाबतही मजबुरी आहे. जनतेमध्ये अँन्टिबॉडी कमी पाहायला मिळत आहेत. आयसीएमआरच्या चौथ्या सीरो सर्व्हेनुसार, ४४.५ टक्के लोकांमध्ये अँन्टिबॉडी आहेत. कुठल्याही महामारीचा अंदाज जाहीर करू शकत नाही. जर व्हायरसचं आणखी म्यूटेशन झालं तर तो कितपत धोकादायक ठरेल हे सांगणं कठीण आहे. परंतु जर स्थिती जास्त बदलली नाही तर तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक धोकादायक नसेल असंही डॉक्टर गगनदीप कांग यांनी म्हटलं आहे.
आता शाळा उघडण्याची वेळ
शाळा उघडण्याची ही योग्य वेळ आहे. परंतु कोणीही संक्रमित झाला तर तातडीने त्याचे विलगीकरण झालं पाहिजे. त्याशिवाय कर्मचारी, शिक्षक यांचे लसीकरण केले जावे. ज्या मुलांना यापूर्वीच एखादा आजार असेल तर त्यांची ओळख पटवावी आणि लसीकरणात अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावं. जर संक्रमण जास्त वाढलं तर आपल्याला शाळा बंद करण्याची तयारी दाखवली पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकता येत नाही अशा विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.