मुसळधार पावसामुळे तमिळनाडूच्या अनेक भागात पूरसदृश परिस्थिती; घरही पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 11:26 AM2023-12-18T11:26:37+5:302023-12-18T11:27:38+5:30
अनेक ठिकाणी रस्ते आणि लोकांच्या घरातही पाणी तुंबलेले दिसले.
मिचाँग चक्रीवादळाच्या प्रभावातून तामिळनाडू अद्याप सावरलेले नाही. राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी रात्री उशिरा ते सोमवारी पहाटे झालेल्या पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ते आणि लोकांच्या घरातही पाणी तुंबलेले दिसले.
तमिळनाडूतील ज्या जिल्ह्यांमध्ये पावसामुळे पूरसदृश परिस्थिती आहे त्यात तिरुनेलवेली, तुतीकोरीन, तेनकासी आणि कन्याकुमारी जिल्ह्यांचा समावेश आहे. तुतीकोरीनमधील तिरुचेंदूरमध्ये दुपारी दीड वाजेपर्यंत अवघ्या १५ तासांत ६० सेमी पाऊस झाला आहे. या काळात तिरुनेलवेलीच्या पलायमकोट्टईमध्ये २६ सेमी पाणी साचले. या १५ तासांत कन्याकुमारीमध्ये १७.३ सेमी पाऊस झाला आहे.
या जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधूनही पाणी सोडण्यात आले असून, त्यामुळे अनेक भागात रस्ते काठोकाठ भरले आहेत. यासंबंधीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये घरे पाण्याने भरलेली दिसत आहेत. दरम्यान, धरणांमधून पाणी सोडण्याबाबत आणि जनजीवनाची काळजी घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे.
#WATCH | Tirunelveli, Tamil Nadu: Streets in the residential area of Selvi Nagar, Sindupoondurai inundated due to incessant rainfall. pic.twitter.com/sUI0eVzwOc
— ANI (@ANI) December 18, 2023
हवामान खात्याने दिला इशारा
आज दक्षिण तामिळनाडूच्या अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थुथुकुडी आणि तेनकासी या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मंगळवारी दक्षिण तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, उत्तर तामिळनाडू आणि कराईकलमध्ये एक किंवा दोन ठिकाणी, एक किंवा दोन ठिकाणी गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवार ते शनिवार तमिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये एक किंवा दोन ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
शासनाने शाळा आणि संस्थांना सुट्टी जाहीर
मुसळधार पावसामुळे तामिळनाडू सरकारने १८ डिसेंबर रोजी तिरुनेलवेली, थुथुकुडी, कन्याकुमारी आणि तेनकासी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, खाजगी संस्था, बँका आणि वित्तीय संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे.