सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत कंडोमची जाहिरात दाखवू नका - माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 08:32 AM2017-12-12T08:32:58+5:302017-12-12T12:02:14+5:30
संपूर्ण कुटुंबासोबत घरात टिव्ही पाहत असताना अचानक लागणा-या कंडोम जाहिरातीमुळे अनेकांची पंचाईत होते. ही अॅड सुरु झाल्यानंतर लगेच चॅनल बदलावे लागते.
नवी दिल्ली - संपूर्ण कुटुंबासोबत घरात टिव्ही पाहत असताना अचानक लागणा-या कंडोम जाहिरातीमुळे अनेकांची पंचाईत होते. ही अॅड सुरु झाल्यानंतर लगेच चॅनल बदलावे लागते. हीच बाब ध्यानात घेऊन केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने वाहिन्यांना सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत कंडोमची जाहीरात दाखवू नये असे निर्देश दिले आहेत. सरकारने अॅडव्हायजरी जारी करुन निर्देश दिले आहेत. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री सनी लिओनीच्या अशाच एक कंडोमच्या जाहीरातीवरुन वाद झाला होता. गुजरातमध्ये नवरात्रीत रस्त्यांवर सनीच्या कंडोमच्या जाहीरातीचे फलक लागले होते. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता.
कंडोम जाहिराती अश्लील असल्याच्या अनेक तक्रारी मिळाल्या होत्या असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. खासकरुन लहान मुलांच्या मनावर या जाहिरातींचा वाईट प्रभाव पडत होता. सकाळी सहा ते रात्री 10 या काळात अनके मालिका सहकुटुंब एकत्र पाहिल्या जातात. त्याचवेळी कंडोमची ही जाहीरात प्रक्षेपित होत असल्याने पंचाईत होत होती.
विविध वाहिन्यांसाठी जारी करण्यात आलेल्या अॅडव्हायजरीमध्ये केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम 1994 अंतर्गत गर्भनिरोधक ब्राण्डच्या जाहिराती प्रदर्शित करु नये असे म्हटले आहे. या निर्देशाने पालन झाले नाही तर तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. वेगवेगळे गर्भनिरोधक ब्राण्डस आपल्या उत्पादनांच्या प्रसिद्धीसाठी मोठया प्रमाणात अश्लील कंटेट दाखवत असल्याच्या अनेक प्रेक्षकांनी तक्रारी केल्या होत्या.
यासंबंधी अॅडव्हटायजिंग स्टॅण्डर्डस काऊंसिल ऑफ इंडियाने अशा जाहीरातींना रात्री 11 ते सकाळी पाच या वेळेत परवानगी द्यावी कि देऊ नये याविषयी मंत्रालयाकडे सल्ला मागितला होता. मंत्रालयाने थोडीशी नरमाईची भूमिका घेतली आणि रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत कंडोमची जाहीरात दाखवायला परवानगी दिली.