तिहेरी हत्याकांड प्रकरणी कंडोमचा सिरियल नंबर बनणार पुरावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 07:57 AM2019-07-18T07:57:46+5:302019-07-18T08:19:15+5:30
पत्नीच्या खूनप्रकरणी पाच वर्षे तुरुंगात काढून निर्दोष सुटलेल्या तिहेरी हत्याकांडातील आरोपीच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी गुन्हे विभाग कोणतीही कसर सोडत नाहीय.
नवी दिल्ली : दिल्लीतील वसंत विहारमध्ये नुकताचा झालेला तिहेरी हत्याकांड कोणताही पुरावा न सोडता पूर्ण तयारीनिशी करण्यात आला होता. मात्र, दोन्ही आरोपींना सलग दहा दिवस पोलिसी खाक्या दाखविताच सर्व कटच उघड झाला आहे. गुन्हे शाखेने वृद्ध दांपत्याच्या घरातून चोरी झालेला मुद्देमाल आणि नर्सच्या डोक्याकडे ठेवलेल्या कंडोमचे सिरियल नंबर ताब्यात घेण्यात आले आहेत.
पत्नीच्या खूनप्रकरणी पाच वर्षे तुरुंगात काढून निर्दोष सुटलेल्या तिहेरी हत्याकांडातील आरोपीच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी गुन्हे विभाग कोणतीही कसर सोडत नाहीय. वसंत विहारमध्ये 22 जूनला ही घटना घडली होती. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी मनोज भट्ट याने वृद्ध दांपत्याच्या घरात राहणारी नर्स खुशबूच्या उशाला कंडोम ठेवला होता. खून करण्याआधी त्याने हे कंडोमचे पाकिट खरेदी केले होते.
पोलिसांची यामुळे काही काळ दिशा भरकटली होती. मात्र, काही दिवसांनी या दिशेने काहीच हाती लागत नसल्याने पोलिसांनी भट्ट आणि त्याची प्रेयसी प्रीतीला ताब्यात घेतले होते. दोन्ही आरोपींना पोलिस गुरुग्रामला घेऊन गेली होती. त्यांच्याकडून एका फ्लॅटमधील कचऱ्यातून रक्ताने माखलेले कपडे, हत्यार आणि दोन कंडोम मिळाले. पोलिस तपासात या दोन कंडोमचा सिरियल नंबर आणि नर्सच्या उशाला ठेवलेल्या कंडोमचा सिरियल नंबर जुळत असल्याचे लक्षात आले आणि या प्रकरणाचा सबळ पुरावा हाती लागला.
हवे तर मोबाईल लोकेशन ट्रेस करा...
पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली पाच वर्षे तुरुंगात घालवणारा मनोज अटट्ल गुन्हेगार आहे. पोलिस हत्याकांडावेळचे मोबाईल फोनचे लोकेशन पाहतील म्हणून त्याने प्रीतीचा आणि त्याचाही मोबाईल गुरुग्रामच्या घरीच ठेवला होता. पोलिसांनी जेव्हा त्या दोघांना हॉटेलमधून ताब्यात घेतले, तेव्हा त्याने हॉटेलमध्ये राहणे हा काही गुन्हा नसल्याचे सांगितले होते. तसेच हत्याकांडाच्या वेळचे मोबाईल लोकेशन तपासा तेव्हा आम्ही कुठे होते हे समजेल, असेही त्याने पोलिसांना सांगितले होते.