अविवाहित महिलांमध्ये वाढतेय कंडोमची मागणी, दहा वर्षात 6 टक्क्यांनी वाढला वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 09:40 AM2018-01-29T09:40:50+5:302018-01-29T10:33:18+5:30
आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षण 2015-16 नुसार, 15 ते 49 वर्षीय अविवाहित महिला ज्या सेक्शुअली अॅक्टिव्ह आहेत त्यांच्यात गेल्या 10 वर्षात कॉन्डमच्या वापर वाढला असून 2 टक्क्यांवरुन 12 टक्क्यांवर पोहोचला आहे
नवी दिल्ली - भारतात अविवाहित आणि सेक्शुअली अॅक्टिव्ह महिला सुरक्षित सेक्सला महत्व देत आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षण 2015-16 नुसार, 15 ते 49 वर्षीय अविवाहित महिला ज्या सेक्शुअली अॅक्टिव्ह आहेत त्यांच्यात गेल्या 10 वर्षात कंडोमचा वापर वाढला असून 2 टक्क्यांवरुन 12 टक्क्यांवर पोहोचला आहे. 20 ते 24 वर्षीय वयोगटातील सेक्शुअली अॅक्टिव्ह अविवाहित तरुणींमध्ये कंडोमचा जास्तीत जास्त वापर केला जात आहे. सर्व्हेक्षणनुसार, आठपैकी तीन पुरुषांचं म्हणणं आहे की गर्भधारणा महिलांची जबाबदारी आहे आणि याच्याशी पुरुषांचं काही देणं घेणं नाही.
कुटुंब नियोजनासाठी महिलांची नसबंदी
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणानुसार 25 ते 49 वर्ष वयोगटातील महिला गर्भधारणा होऊ नये यासाठी नसबंदीला प्राथमिकता देत आहेत. सर्व्हेक्षणानुसार, फक्त एक टक्का महिलांनी आपण इमरजन्सी कॉन्ट्रसेप्टिव्ह पिलचा वापर केल्याचं मान्य केलं आहे.
गर्भनिरोधकांच्या वापरात पंजाब सर्वात पुढे
देशभरात गर्भनिरोधकाच्या पद्धतींचा सर्वात कमी वापर मणिपूर, बिहार आणि मेघालयात केला जातो. या राज्यांमध्ये ही टक्केवारी फक्त 24 टक्के आहे. गर्भनिरोधकांचा वापर करण्याच्या यादीत पंजाब पहिल्या क्रमांकावर असून येथे ही टक्केवारी 76 टक्के इतकी आहे. केंद्रशासित राज्यांबद्दल बोलायचं गेल्यास, 30 टक्क्यांसोबत लक्ष्यद्वीप सर्वात मागे असून चंदिगड 74 टक्क्यांसहित पहिल्या क्रमांकावर आहे.
गोळ्यांच्या वापरात घट मात्र कंडोमच्या वापरात वाढ
सर्व्हेत हेदेखील समोर आलं आहे की, देशभरात अत्याधुनिक गर्भनिरोधाच्या पद्धतींचा वापर करण्यात 65 टक्क्यांसोबत शिख आणि बौद्ध धर्मातील महिला सर्वात पुढे असून, मुस्लिम महिलांमध्ये हे प्रमाणत फक्त 38 टक्के आहे. गर्भनिरोधकांच्या वापराचा संबंध आर्थिक परिस्थितीशीदेखील आहे. गरिब घरातील फक्त 36 टक्के महिला गर्भनिरोधकांचा वापर करत असताना, श्रीमंत कुटुबांमधील 53 टक्के महिला कॉन्ट्रसेप्टिव्हचा वापर करतात. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणात एकूण 6 लाख 1 हजार 509 घरांमध्ये जाऊन मुलाखती घेण्यात आल्या. यामधील 98 टक्के लोकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या.